सावंतवाडी : नऊ महिन्याच्या नवजात अर्भकाचा प्रसृती दरम्यान मृत्यू झाल्याच्या रागातून एका खाजगी डॉक्टरच्या क्लिनिकची तोडफोड केल्याचा प्रकार आज तालुक्यात घडला. याप्रकरणी दोन्ही गटांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु दोन्ही बाजूने तडजोडीची भूमिका घेण्यात आल्यामुळे याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणती नोंद नाही, असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिला ही तालुक्यातील एका डॉक्टरकडे उपचार घेत होती. मात्र तीन दिवसापूर्वी तिला अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉक्टरकडे तपासणीसाठी धाव घेतली. यावेळी डॉक्टरने सर्व काही नॉर्मल असल्याचे सांगितले. परंतु रात्री तिला पुन्हा त्रास जाणवू लागला. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाचे ठोके मिळत नाहीत, परिस्थिती गंभीर आहे, असे सांगून त्या डॉक्टरांनी सिजर करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी मृत बाळ जन्माला आले. दरम्यान संबंधित डॉक्टरने चुकीचा डोस दिल्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झाला, असा नातेवाईकांचा आरोप आहे. याबाबतची माहिती आज गर्भवती महिलेच्या भावाला कळाल्या नंतर त्याने आज संबंधित डॉक्टरची भेट घेतली. त्यावेळी त्या डॉक्टरने त्याला उद्धट भाषेत उत्तरे दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या युवकांनी त्याच्या क्लिनिकची तोडफोड केली. हा प्रकार झाल्यानंतर संबंधित दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर उशिरा दोघांनी तडजोडीची भूमिका घेतली. दरम्यान या घटनेनंतर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यांच्याशी चर्चा केली असता गर्भवती महिला महिलेला प्रसुती अवस्थेत ब्लडप्रेशरचा त्रास निर्माण होऊ शकतो. त्यावेळी हा प्रकार होऊ शकतो. ही एक नैसर्गिक स्थिती आहे. त्यामुळे त्याला डॉक्टरला दोष देणे योग्य नाही. संबंधित डॉक्टरने त्या बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र अचानक बाळाचे ठोके मिळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. संबंधित तोडफोड करणारा युवक हा २३ वर्षाचा तरुण असल्यामुळे माणुसकी म्हणून आम्ही तक्रार देणे टाळले, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.