3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

‘मुलांच्या मोबाईलचे करायचे काय’ मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात सायबर तज्ञ मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन.

सावंतवाडी : ऑर्कुट, वाॅटस् ॲप, फेसबुक, इन्टाग्राम, स्नॅपचॅट आणि तत्सम सोशल मिडिया हे सर्वच काहीना काही विकण्यासाठीच अस्तित्वात आले आहेत. त्यांची रचना व्यावसायिक आहे. मोबाईल सुरु केल्यापासून ते बंद करेपर्यंत विविध माध्यमातून तो पैसा वसूल करतच असतो. मानवाचा वाढता स्क्रीन टाईम आणि इंटरनेट यामुळे त्याचा सामाजिक डिएनए बदलत आहे असे विचार सुप्रसिद्ध सायबर जर्नालिस्ट आणि डिजीटल साक्षरता शिक्षक तथा समुपदेशन मुक्ता चैतन्य यांनी मांडले. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे आयोजीत ‘मुलांच्या मोबाइलचे करायचे काय?, या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन कार्यक्रमात मांडले. आज २९ सप्टेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खांडाळेकर, कार्यकारी सदस्य विकास म्हाडगुत यांची मंचावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमात सुरवातीला सूत्रसंचालक प्रा. डाॅ. ज्योती तोरसकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांचा परीचय करुन दिला आणि त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, यांच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला आणि उपस्थित मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांच्या सामाजिक अभ्यास व कृतीप्रकल्पांची माहिती दिली. विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सेवांगण परिवार मुक्ता चैतन्य यांच्या कार्यक्रमाच्या द्वारे निरामय व आरोग्यदायी पालकत्व, बालपण व ज्येष्ठत्व या सर्वांसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य मार्गदर्शन सत्रात मुक्ता चैतन्य म्हणाल्या की आता मोठ्यांचे व लहानांचे जग वेगळे असते या कल्पनेने चालून उपयोग नाही. मोबाइलपासून उद्भवलेल्या समस्यांचे मूळ पालकांच्या अतिरिक्त स्क्रीन टाईममध्येही आहे. शून्य ते २ वयोगटातील शिशू वर्गाला मोबाईल, टिव्ही, लॅपटाॅप वगैरे कुठलाच स्क्रीन दाखवू नये. २ वर्ष ते १६ वर्ष या टप्प्यात मोठ्यांच्या संपूर्ण देखरेखीखाली मुलांना अर्धातास मोबाईलचा वापर करु द्यावा आणि १६ ते २५ या वयोगटात कामाचे प्राधान्य व डिजिटल विवेकाने हा वापर करावा असेही मुक्ता चैतन्य यांनी सांगितले. मोबाइलच्या वापराने थेट शारिरीक हानी आणि विचारांची जटीलता याबाबत त्यांनी माहिती दिली. ४ वर्षे यानंतर मोबाईल वापरायला संपूर्ण प्रतिबंध शक्य नाही. नो स्क्रीन डे, स्क्रीन टाईम ब्रेक या संकल्पना त्यांनी समजावून सांगितल्या.

सोशल साईटस व वाॅटस ॲपवरील वरील ऑनलाईन भांडणे आज माणसाचे ऑफलाईन जीवन बिघडवतात त्यामुळे माणुस म्हणूनही सामाजिक ध्रुवीकरण होत आहे. मोबाईल किंवा इंटरनेटचा इतिहास हा फार जुना नाही त्यामुळे याबाबतीतील अजून अधिक वैचारीक, मानसी व शारिरीक हानी यांची तीव्रता कोणालाच तितकिशी माहित नाही. जन्मानंतर हातात फोन आल्यावर जीवन बदलते हे वास्तव आहे परंतु आजही कोणीच मोबाईल व लॅपटाॅपसकट जन्माला येत नाही तर माणुस म्हणुनच आपण जन्माला येतो त्यामुळे या समस्यांवर आपण ठरवलं तर आपल्या जीवनाची परिपूर्ण आखणी करुन व त्याची अंमलबजावणी करुन नक्कीच तोडगा काढू शकतो असे त्यांनी आश्वस्त केले. आपल्याला किंवा आपल्या मुलांना मोबाईलचे व्यसन लागलं आहे किंवा लागू शकणार आहे तसेच ही समस्या बनून त्याचा दुष्परिणाम मन, काम, आरोग्य यावर दिसतोय असे वाटले तर समुपदेशन करुन घ्यायला कमीपणा मानू नये असा त्यांनी सल्ला दिला. मोबाईल व्यतिरिक्त मोठी माणसे काय छान छान गोष्टी करु शकतात हे मुलांना दिसलं तर आपोआप मुलं त्याचं अनुकरण करतील व मोबाईलचा वापर कमी होईल असे त्यांनी सुचवले.

सोशल मिडिया आणि टिव्ही वरील इन्फ्ल्युएन्सर, ऑनलाईन गेमिंग, अती माहितीचे दडपण, माहितीवर वैचारीक प्रक्रिया न होणे, मेंदूत निष्कारण माहितीचा साठा होणे, रिलस बघायच्या छंदाने कामाचा व स्वतःला द्यायचा वेळ फुकट जाणे आणि त्यामुळे दडपण, निराशा , तणाव, ऑनलाईन फ्राॅड, १८ वर्षापर्यंत पाॅर्न साईटसच्या वापराची अवैधता अशा विविध गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. जेवताना मोबाईल व टेलिव्हिजनचा वापर माणसाला पोषणापासून दूर ठेवतो व आजार उद्भवतात असे त्यांनी स्पष्ट केले कोविडनंतर डोळे व कानाच्या समस्या झपाट्याने वाढल्या कारण माणसांचा स्क्रीन टाईम वाढला व क्रयशक्ती रोडावली याबाबत त्यांनी जागरुक केले. आज माहिती व कृतींची भुबलक उपलब्धता इंटरनेटवर असल्याने शिक्षण पद्धतीत थोड्याफार बदलाचीही गरज असल्याचे मुक्ता चैतन्य यांनी नमूद केले.या नंतर त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची, शंकांची उत्तरे दिली.

या कार्यक्रमात बुद्धिबळात विशेष प्राविण्य मिळवलेली शालेय मुलं अमूल्या साटम, आदित्य प्रभूगांवकर, आशिष कोकरे, कस्तुरी तलवारे,ऋचा चव्हाण, ओम् गांवकर, अस्मी आठल्येकर, प्रतिक कोकरे यांचा बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान आणि त्यांचे प्रशिक्षक संतोष गांगनाईक यांचा मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांच्या हस्ते शाल व श्रीफळ सत्कार करण्यात आला. यावेळी बुद्धिबळात विशेष प्राविण्य मिळवलेली शालेय विद्यार्थिनी कु. अस्मी आठल्येकर हिने मनोगत व्यक्त केले व तिच्या सर्वांगीण प्रगतीत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खांडाळेकर,कार्यकारी सदस्य विकास म्हाडगुत, पदाधिकारी, समाज अभ्यासक सौ. मंगल परुळेकर, सेवांगण सदस्य, कर्मचारी आणि उद्योजक रुजारीओ पिंटो, प्रा डाॅ सुमेधा नाईक, प्रा. डाॅ. ज्योती बुवा तोरसकर, आहारतज्ञ गार्गी ओरसकर, निवृत्त महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, अधिकारी प्रदीप चव्हाण, श्री. तिणईकर, ओझर विद्यामंदिर मुख्याध्यापक डि डि जाधव, टोपिवाला हायस्कूलचे श्री बर्वेसर, ॠतुजा केळकर, श्रीम. कोळंबकर, पर्णिका जाधव, मामा वरेरकर नाट्यगृह व्यवस्थापक श्री सुभाष कुमठेकर, संजय कासवकर, लोचन केसरकर, सामाजिक संस्थांचे सदस्य तसेच विविध शाळांचे शिक्षक, पालक, ज्येष्ठ नागरीक आणि नागरीक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मुक्ता चैतन्य यांचे आणखीन मार्गदर्शन उपक्रथ्त आयोजीत केले जातील असे सांगितले आणि याबाबत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे समुपदेशन केले जाईल अशी ग्वाही दिली. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मार्गदर्शक मुक्ता चैतन्य आणि उपस्थित पालक, मुलं, शिक्षक, मालवण नगरपरिषद प्रशासन व कर्मचारी आणि सर्वांचे तसेच कार्यक्रमाला सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!