णकवली : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक घटक आहे. या घटकाला समाजात मान, सन्मान, आदर मिळला पाहिजे. यासाठी ज्येष्ठांनी संघटित झाले पाहिजे. ज्येष्ठ व पेन्शनर व्यक्तींचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ व पेन्शनर असोसिएशन या दोन संघटना कार्यरत असून जिल्ह्यातील ज्येष्ठ व पेन्शनर्सनी या संघटनांचे सभासद व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ व पेन्शनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व कणकवली तालुका प्रवासी व ग्राहक पंचायतीच्या कणकवली शाखेच्या सौजन्याने येथील लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये ज्येष्ठांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. मराठे बोलत होते. यावेळी तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव प्रमोद लिमये, पेन्शनर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतकर, एस. एल. सपकाळ, अर्जुन राणे आदी उपस्थित होते.
मराठे म्हणाले, शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही केलेले नाही. ज्येष्ठांसाठी असलेला संरक्षण कायदा अद्यापही झालेले नाही. ६० वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला शासनाच्या समितींवर घेतले जात नाही. ज्येष्ठांसाठी शासनाने विशेष अधिकार कायदा करावा, अशी मागणी आहे. मात्र, या मागणीकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. केंद्र शासनाने सर्वच वस्तूंवर जीएसटी लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागल्याने त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
देशातील संस्कृतीत अमुलाग्रह बदल झाला आहे. परिणामी कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाल्याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठांना बसत आहे. ज्येष्ठांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यरत असून या संघटनेचे ज्येष्ठांनी सभासद व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठांसाठी असलेले कायद्यांबाबत मनोहर पालयेकर यांनी माहिती दिली. जिल्ह्यात वाढत असलेल्या वृद्धाश्रमांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्येष्ठांनी आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित योग व ध्यान करावे, असा सल्ला प्रमोद लिमये यांनी दिला. दादा कुडतकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.