आपटेने पोलिसांना दिलेली माहिती मिळाल्याचा दावा
मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुमारे दोन कोटीहुन अधिक रकमेच्या कामातून शिल्पकार जयदीप आपटेला फक्त २६ लाख रूपये मिळाल्याची कबुली त्याने पोलीस तपासात दिली आहे, याबाबतची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम आपटेच्या खात्यातून कोणाला देण्यात आली आहे, याचा तपास पोलीस यंत्रणांनी करायला हवा. आपटेला आता न्यायालयीन कोठडी झाली असली तर त्याला जामीन मिळू नये यासाठी सत्ताधारी मंडळीच प्रयत्न करत आहेत. आपटे बाहेर आला आणि त्याने याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये खरे सांगितले तर? याची भिती सत्ताधारी लोकांना असून हे प्रकरण दडपण्यासाठीच त्याला कारागृहात ठेवून निवडणुकीनंतर बाहेर काढण्यात येणार असल्याचा प्लॉन आहे, असा खळबळजनक आरोप उबाठा शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. उबाठा पक्षाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, यतीन खोत, भाई कासवकर, उमेश चव्हाण, सुरेश मडये, दत्ता पोईपकर, सुहास वालावलकर, अन्वय प्रभू, अक्षय भोसले, प्रसाद आडवणकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जयदीप आपटेला सत्ताधारी मंडळींनीच लपवून ठेवला होता. प्रकरण शांत करण्यासाठी त्याला कडक पोलीस बंदोबस्तात मालवणमध्ये आणण्यात आले होते. आपटे प्रसारमाध्यमांसमोर जावू नये याची पूर्ण दक्षता सत्ताधारी मंडळींनी घेतली आहे. आता त्याला कारागृहात ठेवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत त्याला कारागृहातच ठेवण्यात येण्याची भिती आहे. तो बाहेर आला तर शिवपुतळा दुर्घटनेतील खऱ्या दोषींची नावे जनतेसमोर येण्याची शक्यता आहे. यात सत्ताधारी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री, त्यांचे स्वीय सहायक यांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. आपटेने पोलीस तपासात दिलेली माहिती खळबळजनक आहे, यामुळे त्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येत नसल्याचा आरोप श्री. केणी यांनी केला आहे. आपटे याने पोलीसांना दिलेल्या जबाबाची माहिती आम्हाला मिळाली आहे. यात त्याने आपल्याला फक्त २६ लाख रूपये मिळाल्याचे सांगितले आहे. जर आपटेला एवढीच रक्कम मिळाली आहे, तर मग उर्वरीत रक्कम कोणाच्या खात्यात गेली ? याचा तपास व्हायला हवा. तपासिक यंत्रणांना आपटे आणि चेतन पाटील यांच्या व्यतीरिक्त इतर कोणालाही अद्याप अटक केली नसल्याने हे प्रकरण दोघांवरच थांबविण्याची भिती निर्माण झाली आहे.
शिवपुतळा दुर्घटनेची सत्य माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. सत्ताधारी मंडळींनी यातून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केला असल्याने ती आपली माणसे आणि आपण वाचविण्यासाठी हे प्रकरण लवकरात लवकर दडपण्याच्या तयारीत आहेत, असाही आरोपही श्री. केणी यांनी केला आहे. दोन कोटी रूपये आपटेला देण्यात आले होते. ही रक्कम आपटेच्या खात्यातून कोणाकोणाला गेली याची सविस्तर माहिती तपासिक यंत्रणांनी बाहेर काढल्यास अनेक चेहरे उघडे पडणार आहेत. मात्र ही माहिती देण्यात येणार नसल्याने आपटेलाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपटेच्या खात्यातून अनेक मंत्री, आमदार, स्वीय सहायक, सत्ताधारी मंडळी यांनाही पैसे गेले असल्याचा आरोपही श्री. केणी यांनी केला आहे. आम्ही पुतळा दुर्घटनेचे सत्य बाहेर काढण्यासाठीच लढा देत राहणार आहोत, असेही श्री. केणी यांनी स्पष्ट केले.
सत्ताधाऱ्यांनी भष्ट्राचार करून बनविलेला पुतळा दुर्घटनाग्रस्त बनल्याने त्यांना आता त्याठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा नैतीक अधिकार राहिलेला नाही. आपले पाप त्यांनी नौदलावर टाकण्याचाही प्रयत्न केला आहे. आमचा आमच्या नौदलावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी त्याठिकाणी नौदलाचे म्युझियम बनवून नविन पिढीला नौदलाची माहिती होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी शहरात स्वाक्षऱ्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच नौदलला तशाप्रकारचे एक निवेदन उबाठा शिवसेनेकडूनही देण्यात येणार असल्याचे श्री. केणी यांनी स्पष्ट केले.