16.2 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

कुडाळमध्ये २८ सप्टेंबर पासूनराज्यस्तरीय पालकमंत्री चषक कॅरम स्पर्धा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य

विश्वविजेत्यांसह ३०० स्पर्धक होणार सहभागी..

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २८ ते ३० सप्टेंबर दरम्याने कुडाळ येथे कॅरमची वरिष्ठ राज्य मानांकन ‘पालकमंत्री चषक’ आयोजित करण्यात आली आहे. या बाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सरचिटणीस रणजीत देसाई, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, क्रीडा प्रकोष्ठ जिल्हा संयोजक योगेश फणसळकर, कॅरम असोसिएशनचे सुनील धुरी, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, श्रीपाद तवटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, देवेंद्र सामंत, राजा धुरी, भाई बेळणेकर, संयोजक विश्वास पांगुळ, माजी सभापती मोहन सावंत आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने, सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने वरीष्ठ राज्य मानांकन कॅरम “पालकमंत्री चषक” स्पर्धा कुडाळच्या महालक्ष्मी हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमधे राज्यभरातून सुमारे २५० ते ३०० स्पर्धक सहभागी होतील. ३ विश्वविजेते, २७ आंतरराष्ट्रीय खेळाडू, १४ राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सध्याचा विश्वविजेता मुंबई उपनगरचा संदिप दिवे, त्या आधीचा विश्वविजेता आणि विश्वचषक विजेता रिझर्व बँकेचा मुंबईचा प्रशांत मोरे व पुणे येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा दोन विश्वविजेते पद, विश्वचषकासह ५८ आंतराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता योगेश परदेशी हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असतील.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन ही देशात नव्हे तर संपूर्ण जगात अग्रेसर कॅरम संघटना आहे. सोशल मिडियावर ३ लाख फॉलोअर्स आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेतील सुमारे ५० सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगभरातले कॅरम रसीक पाहू शकणार आहेत.

ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन मान्यता प्राप्त सुरको किंग या २४ कॅरम बोर्डवर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी कोल्हापूर येथील बीएसएनएलचे सुर्यकांत पाटील व कुडाळ येथील मधुकर पेडणेकर हे दोन राष्ट्रीय कॅरम पंच, प्रमुख पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आंतराष्ट्रीय कॅरम पंच अजित सावंत हे तांत्रिक अधिकारी तर शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतराष्ट्रीय कॅरम खेळाडू अरुण केदार हे स्पर्धा निरीक्षक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ जिल्ह्यात गठीत झाल्यानंतरचा हा पहिलाच मोठा उपक्रम संपन्न होत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण स्वतः कॅरम प्रेमी आहेत. त्यांनी ठाणे डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्षपद भुषविले आहे. ‘पालकमंत्री चषक’ या नावामागे संकल्पना अशी आहे की दरवर्षी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत ही कॅरमची राज्यस्तरीय स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळविली जाईल.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा कॅरम असोसिएशन मार्फत आपली नावे देण्याची अंतिम तारीख दिनांक १९ सप्टेंबर २०२४ ही आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात आपल्या जिल्हयातील २ गुणवंत कॅरमपटू मुलींनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले, ही बातमी पालकमंत्र्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी जाहीर कार्यक्रमामधे त्यांचं कौतुक करून त्यांना नवे कोरे कॅरमबोर्ड देऊन प्रोत्साहीत केले होते.

या स्पर्धेच्या घोषणेनंतर खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर इत्यादींनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत व स्पर्धेच्या उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनने ४ राज्यस्पर्धा व वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचे यजमानपद यशस्वीपणे भुषविले आहे. सावंतवाडी येथील २०१९ च्या वरिष्ठ राज्य कॅरम मानांकन स्पर्धेनंतर ५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यस्तरीय स्पर्धा पुन्हा एकदा सिंधुदुर्गमधे होत असल्याचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!