10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

नॅनो कारची रिक्षाला धडक

देवगड : तालुक्यातील आंबेरी पोलीस दूरक्षेत्रनजीक नॅनो कारची रिक्षाला धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षामधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रशीद शहाबुद्दीन सय्यद (७०, रा. गिर्ये) व रवींद्रनाथ जयराम देवळेकर (६०, रा. गिर्ये) अशी जखमींची नावे आहेत. तर रिक्षाचालकास नॅनोमधील एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात सोमवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गिर्ये- जांभुळवाडी येथील रिक्षाचालक अस्लम अली सय्यद (५२) हे आपल्या ताब्यातील रिक्षातून त्यांचे भावोजी रशीद सय्यद व ग्रामस्थ रवींद्रनाथ देवळेकर यांच्यासमवेत सोमवारी सकाळी पडेल कॅन्टीन ते आंबेरीमार्गे राजापूर- सागवे येथे जात होत. तर याचदरम्यान तिर्लोट येथील रोहन रमाकांत दळवी (३२) हे आपल्या ताब्यातील नॅनो कारने तेथील लवू गोविंद दळवी (७०) यांच्यासमवेत पडेल कॅन्टीनच्या दिशेने जात होते. आंबेरी पोलीस दूरक्षेत्र येथे अस्लम सय्यद यांची रिक्षा आली असता रोहन दळवी यांच्या नॅनो कारची रिक्षाला डावीकडील बाजूस मधोमध वेगाने धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रिक्षामधील प्रवासी रशीद सय्यद व रवींद्रनाथ देवळेकर हे रिक्षामधून बाहेर गेले. यात रशीद सय्यद यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. रवींद्रनाथ देवळेकर यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर रिक्षाचालक अस्लम सय्यद यांच्या खांद्याला, कोपराला व डोक्याला किरकोळ दुखापत झाली. नॅनोमधील प्रवासी लवू दळवी यांच्या डोक्याला व मानेलाही किरकोळ दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर नॅनो कारचालक रोहन दळवी याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अन्य खासगी वाहनाने जखमींना देवगड येथे उपचारासाठी नेले. यातील रवींद्रनाथ देवळेकर व रशीद सय्यद यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून देवळेकर यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे, तर रशीद सय्यद यांना मुंबई येथे हलविण्यात आले. किरकोळ जखमी झालेले रिक्षाचालक अस्लम सय्यद व नॅनोमधील प्रवासी लवू दळवी यांच्यावर देवगडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, आशिष भाबल, सुनील पडेलकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघाताची फिर्याद रिक्षाचालक अस्लम सय्यद यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास विजयदुर्ग पोलीस करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!