कणकवली : शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम केंद्रामधील कॅश डिपॉझीट करणाऱ्या मशिनमध्ये कॅश डिपॉझीट न झाल्याने एका ग्राहकाला तब्बल २० हजार रूपयांचा फटका बसला आहे. या प्रकरणी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून पैसे नेणाऱ्या त्या व्यक्तीचा तपास केला जात आहे.
शहरातील एका ग्राहकाने सोमवारी रात्री साडे आठ वाजता एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम केंद्रातील कॅश डिपॉझीट मशीनमध्ये २० हजार रुपये भरले. त्यानंतर पैसे भरल्याचा आवाज आल्यानंतर तो ग्राहक एटीएम केंद्रातून बाहेर पडला. मात्र त्या ग्राहकाचे कॅश डिपॉझीट ट्रॅन्झॅक्शन्स फेल झाले होते. त्यामुळे भरलेली रक्कम पुन्हा मागे आली होती. या दरम्यान एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या ही बाब निदर्शनास आली. त्या व्यक्तीने कॅश डिपॉझीट मशिनच्या बाहेर आलेले २० हजार रूपये घेऊन तेथून पोबारा केला.
दरम्यान कॅश डिपॉझीट करणाऱ्या त्या व्यक्तीला सकाळी बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नसल्याची बाब निदर्शनास आली. त्याने संबधित बँकेत जाऊन माहिती घेतली असता त्या एटीएम केंद्रातील मशीनमध्ये कॅश डिपॉझीट झाली नसल्याची बाब लक्षात आली. यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्या नंतर अज्ञात व्यक्तीने ते पैसे नेल्याची बाब दिसून आली. या प्रकरणी संबधित व्यक्तीने कणकवली पोलिसांत धाव घेतली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार दाखल केली नव्हती.