15.1 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक

कणकवली : तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी व वाहने दाखल होत असतात. त्यासाठी योग्य नियोजन संबंधित विभागाने करण्याची गरज आहे. रा.प. महामंडळाने प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतूक तसेच रेल्वे स्टेशनवरून गरजेनुसार बसस्थानक अथवा प्रवासी उपलब्धतेनुसार गावापर्यंतची वाहतूक करण्याचे नियोजन करावे, रिक्षा चालकांकडून भाडे नाकारणे अथवा जादा भाडे तक्रार आल्यास तातडीने कारवाई करावी. कणकवली शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये पार्किंग व्यवस्था फळ, भाजी विक्रेते यांच्यासाठी जागा निश्चित करुन वाहतूक कोंडी होणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, अशा सक्त सुचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या.

कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, पोलीस निरीक्षक मारूती जगताप, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणोती इंगवले, परीविक्षाधिन उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, नायब तहसीलदार शिवाजी राठोड तसेच इतर सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली उड्डाणपुलाखाली, सर्व्हिस रोडवर अनेक वाहने पार्किंग केली जात आहेत. त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई पोलीसांनी करावी. मुंबई गोवा महामार्गावर वाढत्या वाहतूकीमुळे कुठेही अपघात घडल्यास क्रेनची व्यवस्था करण्यात यावी.

कुठेही अपघात घडल्यास क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. त्याठिकाणी महामार्ग प्राधिकरणने काळजी घेतली पाहिजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्ग, अंतर्गत मार्ग तसेच घाटमार्गाचा रस्ता सुरळीत ठेवावा, खड्डे तातडीने बुजवून घ्यावेत. घाटरस्त्यावर काही समस्या उद्भवल्यास जेसीबीची व्यवस्था करावी. गणेशोत्सव कालावधीत विजपुरवठा खंडीत होऊ नये, याची दक्षता वीज वितरण कंपनीने करण्याची गरज आहे. काही समस्या उद्धवल्यास तातडीने सुरळीत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांनी फोन सुरु ठेवावेत व ग्राहकांशी सौजन्याने बोलावे, अशा सूचना श्री. कातकर दिल्या.

कणकवली शहरात पार्किंगसहीत, फळ, भाजी व इतर विक्रेत्यांना जागा निश्चित करून देण्यासोबतच फूटपाथ मोकळे करा. तसेच मुंबईहून येणाऱ्या लक्झरी बसेस धांबण्यासाठी शिवाजीचौक अथवा अन्य टिकाणी जागा निश्चित करावी. बाजारपेठेत वाहतूक कोंडी होणार नाही. गणेशोत्सवाच्या अगोदर व नंतरच्या कालावधीत बाजारपेठेत तसेच मुख्य चौकाच्या दोन्ही बाजूने सेवा रस्त्यांवर गर्दी होणार आहे. यासाठी पार्किंगसहीत सर्व व्यवस्था करण्याच्यादृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने कार्यवाही करावी. बाजारपेठेतील दुकानांचे अतिक्रमण, फिरते विक्रेते, वाहन पार्किंग, गावातून गणेशोत्सव साहित्य घेऊन येणाऱ्यांसाठी जागा नियोजन करावे, असेही श्री. कातकर यांनी नगरपंचायत प्रशासनाला सांगितले आहे.

गणेश उत्सव काळात काही समस्या उद्भवल्यास तहसीलदार कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज आहे, तेथे संपर्क साधण्यात यावा. तसेच फोंडाघाट बाजारपेठेतही वाहतूक पोलीस देऊन वाहतूक कोंडी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. असेही श्री. कातकर यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!