वाढते गुन्हे व आगामी काळातील उत्सवांसंबंधी सविस्तर चर्चा
कोल्हापूर | यश रुकडीकर
_________________________
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय,कोल्हापूर येथे आढावा बैठक घेतली.या बैठकीत वाढत्या गुन्हेगारीसोबतच आगामी काळातील सण-उत्सवांमध्ये करावयाच्या उपाययोजना यांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.या बैठकीमध्ये दहीहंडी व गणेशोस्तव काळात रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे व त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले.सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गावभेटी,शांतता कमिटी व गणेश मंडळांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.जी मंडळे उल्लेखनीय उपक्रम जसे की समाजप्रबोधन करणारे देखावे साकार करतील व गणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन शिस्तबध्द पध्दतीने शांततेत करतील त्या गणेश मंडळांना कोल्हापूर पोलीस दलातर्फे बक्षीस देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.या काळात सोशल मीडिया मॉनिटरिंग करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच शिये भागातील १०वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केलेल्या नराधमाला ८ तासात अटक केल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांचे अभिनंदन फुलारी यांनी केले. बीट मार्शल पेट्रोलिंग,पायी गस्त,प्रभावी रात्रगस्त,कोंबिंग ऑपरेशन,नाकाबंदी यांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोल्हापूर पोलीसांचे अभिनंदन केले व ही कारवाई पुढेही अशीच चालू ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले.
या बैठकीला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक खाटमोडे पाटील,जयश्री देसाई तसेच सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.