15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

कणकवलीत उद्या निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह…

आशिये दत्त मंदिर येथे होणार कार्यक्रम ; गधंर्व परिवाराचे आयोजन…

कणकवली, ता. २३ : शहरालगतच्या आशिये दत्त मंदिर येथे उद्या शनिवारी २४ ऑगस्टला सायंकाळी निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह साजरा होणार आहे. गंधर्व फाऊंडेशन कणकवली व निवृत्ती श्री.दाभोळे यांच्या शिष्य व मित्र परिवारातर्फे गेले पाच वर्षे निवृत्ती दाभोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत समारोह आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षीही अत्यंत उत्साहात हा सोहळा साजरा होणार आहे.

श्री. दाभोळे यांनी कणकवली येथे अनेक वर्षे शास्त्रीय संगीत साधना करून येथील सांगीतिक वातावरण प्रवाही ठेवले. श्री. दाभोळे यांच्या सांगीतिक कार्याची आठवण म्हणून सिंधुदुर्गातील शास्त्रीय गायक, वादक कलाकारांना एक दर्जेदार मंच उपलब्ध व्हावा व शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा, यासाठी या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते.

शनिवार २४ ऑगस्टला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणाऱ्या या मैफलीमध्ये कणकवलीतील तबला विशारद तबला वादक श्री. बबन कदम हे आपल्या शिष्यांच्या साथीने तबला वादन करणार आहेत. त्यानंतर संगीत अलंकार सौ. तेजस्विता पेंडुरकर यांचे शास्त्रीय गायन व सोबतच अभंग, नाट्यपद गायन होणार आहे.

या कार्यक्रमात बाल कलाकार काव्या गवंडळकर, पर्ण नायगावकर, पारवी नायगावकर, अनुष्का आपटे हे ही आपली गायन कला सादर करणार आहेत. या मैफलीत लेहरा साथ श्री.अर्जुन मेस्त्री, तबला साथ श्री. वेदांत कुयेस्कर व संवादिनी साथ श्री. संदीप पेंडुरकर हे करणार आहेत.

कणकवलीतील आशिये दत्त मंदिर येथे २४ ऑगस्टला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणाऱ्या या संगीत समारोहास रसिकांनी उपस्थित राहून संगीताचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गंधर्व फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!