महावितरण कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा
कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ५५० कंत्राटी कामगारांचा पगार सप्टेंबर महिन्याच्या ४ तारीखच्या अगोदर देण्यात यावा. याबाबतच्या सूचना कंपनीने संबंधित ठेकेदाराला द्याव्यात अशी मागणी कामगार नेते अशोक सावंत यांनी केली आहे.
कुडाळ महावितरण सर्कल अधिक्षक अभियंता अशोक साळुंखे तसेच कुडाळ विभागीय कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांची कामगार नेते अशोक सावंत तसेच वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कामगाराच्या विविध प्रश्नांसाठी भेट घेतली. यावेळी कुडाळ डिव्हिजनमधील कायम कामगारांच्या रिक्त जागेवर, कंत्राटी कामगारांना त्या जागेवर एक आठवडा झाला तरी अजूनही ऑपरेटर या पदावर हजर होण्यासाठी ऑर्डर देण्यात आली नसल्यामुळे त्यांची गैरहजेरी लागत आहे. या संदर्भात ऑपरेटर व लाइनस्टाफ सबंधित ठेकेदाराला सांगून त्वरित कामगारांना कामाची ऑर्डर देवून कामावर हजर करण्यात यावे असे महावितरण प्रशासनाला सांगण्यात आले. यावर महावितरण प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कंत्राटी कामगारांना त्वरित ऑर्डर देण्यासाठी सांगितले. तसेच कामगारांच्या कामाची वेळ किती आहे हे सांगावे त्यांनी किती तास काम करावे यावर चर्चा करण्यात आली.
पुढील महिन्यात गणेश चतुर्थी असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काम करत असलेल्या सुमारे ५५० कंत्राटी कामगारांचा पगार सप्टेंबर महिन्याच्या ४ तारीखच्या अगोदर देण्यात यावा अशा सूचना कंपनी प्रशासनाने संबंधित ठेकेदाराना द्याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी ओरोस सेक्शन ऑफिसमधील चेतन बिड्ये या कामगाराचे आकस्मिक निधन झाले. त्याची ७२ तासाच्या आत इएसआयसी ऑफिसला नोंदणी करणे गरजेचे आहे.त्यामुळे ती नोंदणी त्वरित करण्यात यावी. जेणेकरून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल असे संघटनेच्या वतीने मांडण्यात आले. यावेळी कामगार नेते अशोक सावंत, वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष संदीप बांदेकर, सचिव योगराज यादव, गणेश राऊळ, करण परब, शुभम केरकर, संकेत शिंदे, अजित पालकर, मुरलीधर देसाई आदी उपस्थित होते.