अंनिस, अखंड लोकमंच आणि परिवर्तनवादी संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग….
कणकवली : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली शहरात आज निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कणकवली आणि अखंड लोकमंच तसेच इतर परिवर्तनवादी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सकाळी साडे सहा वाजता पटकीदेवी मंदिर येथून या फेरीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील बाजारपेठ, पटवर्धन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत निर्भय मॉर्निंग फेरी काढण्यात आली. यात सहभागी कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती जागवल्या. डॉ. दाभोलकर यांनी आपल्या परिवर्तनवादी विचारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशभरात अंधश्रद्धेविरुद्ध मोठा लढा उभारला. अंनिसच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. आज या निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून डॉ. दाभोळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. समाजात भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांना निर्भयपणे सामोरे जाण्याची प्रतिज्ञा करण्यात आल्याची माहिती यावेळी अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी दिली. समारोपाच्या वेळी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ॲड. मनोज रावराणे, डॉ. सतीश पवार, डॉ. चंद्रकांत पुरळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, इंद्रजीत खांबे, संतोष कांबळी, डॉ.आशिष नाईक, ऋषिकेश कोरडे, विनायक सापळे, अखंड लोकमंचचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक आणि इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.