प्रांताधिकारी चर्चेला येत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही
उपोषणाचा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षित ; वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तरी गांभीर्यानं दखल घेतील का ?
कणकवली : वैभववाडी तालुक्यातील संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना लाभा पासून वंचित ठेऊन शासनाकडून आलेले अनुदान परत पाठविणा-या तसेच आलेल्या प्रस्तावांवर मुदतीत कार्यवाही न करता गरजू निराधार, दिव्यांग व्यक्तिना नाहक त्रास देणाऱ्या व शासन अनुदानाचे अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करुन दप्तर दिरंगाई कायदा २००६ व सेवा हमी कायदा २०१५ नुसार कारवाई करावी. या मागणीसाठी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रोहन नलावडे यांनी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज १५ ऑगस्ट नंतर १६ ऑगस्ट हा उपोषणाचा दुसरा दिवस होता. तरीही उपोषण सुरूच होते.
प्रांताधिकारी कार्यालयासमोर असलेल्या गेट जवळ हे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र १५ ऑगस्ट पासून आजपर्यंत कोणिही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहिले नाही. श्री. नलावडे यांच्या म्हणण्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी आपला एक प्रतिनिधी पाठवला होता. मात्र त्यात आपले म्हणणे समजून न घेता उपोषण करत असलेले मुद्दे चुकीचे आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही, असे नमूद असल्याचे निदर्शनास आल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले. त्यामुळे ते पत्र आपण स्वीकारले नाही,असेही ते म्हणाले.
तसेच अगदी प्रांताधिकारी कार्यालायसमोरच आमरण उपोषण सुरू आहे. मग प्रांताधिकाऱ्यांना वेळ नाहीच ? चर्चा करण्यासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तरी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेणार का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मात्र आता या उपोषणाला जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील लोकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष शांताराम सादये, उपतालुकाध्यक्ष अतुल दळवी, शहराध्यक्ष योगेश कदम यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्ते श्री. नलावडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनतर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना मोबाईलवरून संपर्क केला. त्यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने आपण लवकरच याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधू व तोडगा काढू असा, इशारा देखील श्री. मेस्त्री यांनी दिला.
तसेच प्रांताधिकारी जर कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला प्रांताधिकारी भेट देत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांसोबत त्यांची वागणूक कशी असेल ? असा सवाल देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. त्यामुळे आपण लवकरच प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊ जर तिथे समाधानकारक उत्तर नाही मिळाले तर वरिष्ठांकडे लक्ष वेधू असा, विश्वास श्री. नलावडे यांना दिला.