सावंतवाडीतील घटना ; मुलीची धावत-पळत पोलीस ठाण्यात धाव
सावंतवाडी : पैसे चोरल्याच्या संशयावरून आठवीत शिकणाऱ्या मुलीला आईसह तिच्या प्रियकराने मद्यधुंद अवस्थेत बेदम मारहाण केली. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील एका गावात घडली. आपल्याला झालेली मारहाण सहन न झाल्यामुळे तिने धावत-पळत पोलीस ठाणे गाठले व झालेला प्रकार पोलिसांना सांगितला त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित अल्पवयीन मुलगी आहे. तालुक्यातील एका गावात आपल्या आईसह राहते. आई-वडिलांचे पटत नसल्यामुळे वडिल मुंबईत विभक्त राहतात. दरम्यान आज तिच्या आईचा मित्र मध्यधुंद अवस्थेत घरी आला. यावेळी त्या अल्पवयीन मुलीने पैसे चोरले, असा आरोप करून त्या प्रियकरासह तिच्या आईने त्या मुलीला मारहाण करण्यास सुरू केली. यावेळी घाबरलेल्या मुलीने तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली तसेच आपण आई सोबत राहणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानुसार तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्या दोघांच्या विरोधात बाल संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. तर संबंधित मुलीला अंकुर महिला वस्तीगृहात ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीही ती अंकुर महिला वस्तीगृहात होती. परंतु तिथून ती पळून गेली होती. आता तिने स्वतःहून आपण अंकुर मध्ये राहणार असल्याचे सांगितले आहे तर या प्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, असे चव्हाण म्हणाले.