21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 15 एप्रिलपासून ‘ही’ सेवा होणार बंद

मुंबई : आजकाल स्मार्टफोन्सची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे आपलं दैनंदिन जीवन सोपं झालं आहे. त्यामुळे जवळपास सर्वच लोकांकडे 2जी, 3जी, 4जी किंवा 5जी यापैकी एखादा फोन आहे.

15 एप्रिलपासून या फोनवर एक मोठी सेवा बंद होणार आहे. तुम्ही देखील यापैकी एखादा फोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी देखील महत्त्वाची आहे. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना पुढील आदेशापर्यंत ही सेवा बंद ठेवण्यास सांगितलं आहे. ही सेवा कोणती आहे, याबाबत याठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आपल्यापैकी काहीजण फोनवर *121# किंवा *#99# सारख्या यूएसएसडी सेवा वापरतात. दूरसंचार विभागाने पुढील आदेशापर्यंत अशाच एका सेवेवर बंदी घातली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) दूरसंचार कंपन्यांना 15 एप्रिलपासून यूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत, ग्राहकांना कॉल फॉरवर्डिंगसाठी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, अशी शक्यता आहे.

मोबाईल ग्राहक त्यांच्या फोन स्क्रीनवर कोणताही अॅक्टिव्ह कोड डायलकरून यूएसएसडी सेवा वापरतात. मोबाइल फोनमधील आयएमईआय नंबर आणि शिल्लक रिचार्ज संबंधीची माहिती शोधण्यासाठी या सेवेचा वापर केला जातो. मोबाईल फोनद्वारे होणारी फसवणूक आणि ऑनलाइन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने हा आदेश जारी केला आहे.

दूरसंचार विभागाने 28 मार्च रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, एसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) आधारित कॉल फॉरवर्डिंग सुविधेचा काही अयोग्य कारणांसाठी गैरवापर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे, 15 एप्रिल 2024 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व यूएसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशात असंही म्हटलं आहे की, सर्व विद्यमान ग्राहक ज्यांनी यूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग अॅक्टिव्ह केलं आहे त्यांना पर्यायी पद्धतींद्वारे कॉल फॉरवर्डिंग सेवा पुन्हा अॅक्टिव्ह करण्यास सांगितलं पाहिजे.

गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल फोनच्या वापरसोबतच त्याचा गैरवापरही वाढला आहे. दूरसंचार विभाग यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी वेळोवेळी विविध निर्णय घेतले जातात. हा निर्णय देखील त्याचाच एक भाग आहे, असं म्हटलं जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!