कणकवली : महाराष्ट्र शासनाची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना कणकवली शहरात प्रभावीपणे राबविणेसाठी कणकवली नगरपंचायत मा. मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका, मदतनीस व नगरपंचायत कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी सर्व अंगणवाडी केद्रावर व नगरपंचायत येथे मोफत अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून परिपूर्ण भरलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार असून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
सोमवार दि. ८ जुलै २०२४ पासून कणकवली शहरातील खालील ठिकाणी अर्ज स्वीकृती केद्र सुरु करण्यात आलेली आहेत. शाळा नं – १ आचरा रोड, शाळा नं – २ बांधकरवाडी, शाळा नं- ३ भालचंद्र नगर, शाळा नं – ४ पंचायत समितीच्या मागे, शाळा नं ५ जळकेवाडी, सिद्धार्थनगर येथील सर्व अंगणवाडी मध्ये व नगर पंचायत येथे सकाळी १० ते ५ वेळेत विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शहरामध्ये जाहीर आवाहन व इतर माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. शहरातील सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.