अकोला : लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या उमरीच्या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. राजेश शेळके, असे या तलाठ्याचे नाव आहे. काय प्रकरण?शेळके हा अकोला तालुक्यातील उमरीत कार्यरत आहे. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जुळविण्यासाठी कार्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.
हीच संधी साधून शेळके यांनी एका महिलेला लाच मागितले. हे पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच शेळकेंवर कारवाईची मागणी वाढू लागली. यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशावरून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी शेळके यांना निलंबित केले आहे. या घटनेच्या आदल्या दिवशी अमरावतीतही एका तलाठ्याला लाचखोरीत अटक करण्यात आली होती. सातत्याने या घटना घडत असल्याने सरकारने कडक पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.‘लाडकी बहीण योजनेच्या दाखल्यांसाठी कुणीही पैशांची मागणी केल्यास देऊ नये.
याविषयीची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात करावी. कुणालाही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही,’ असे अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी म्हटले आहे. निकष बदलले तरीही गर्दी कायमवाशीम : ‘ लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी रद्द करण्यात आल्या असल्या तरीही बुधवारी रांगा कायम होत्या. तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी महिलांची सकाळपासून झुंबड उडाली होती. या योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही, असा दावा केला जात असला तरी महिलांना अपुरी माहिती मिळत असल्यामुळे सर्वत्र गोंधळाची परिस्थिती आहे.
राज्यात १ जुलैपासून लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी सुरवातीला १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार होते. नंतर ही मुदत ३१ ऑगस्ट करण्यात आली. शेतीची अटही काढून टाकली. अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न मर्यादा यामध्ये सूट दिली आहे. तरीही उत्पनाचा दाखला घेण्यासाठी तलाठी कार्यालयात शेकडो महिलांची गर्दी सकाळपासूनच जमली होती. वाशीम शहरातील जुनी नगर परिषद जवळ तलाठी कार्यालय आहे. येथे सकाळपासून महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.