दीपक केसरकरांकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत
वेंगुर्ले : येथील बंदरात घडलेल्या होडी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रत्नागिरी येथील चौघा खलाशांच्या कुटुंबीयांना मंत्री दीपक केसरकर यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांना प्रत्येकी ५० हजाराची मदत दिली आहे. याबाबतची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली आहे. ही घटना २३ मे ला रात्री समुद्रात घडली होती. यावेळी स्थानिक मच्छीमार बाबी रेडकर यांची होडी उलटून चौघा जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मंत्री केसरकरांनी श्री. रेडकर यांना दिले होते. तसेच मयतांचे मृतदेह त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याची व्यवस्थाही केली होती. दरम्यान यातील ३ खलाशी जरी राज्या बाहेरील असले तरी याठिकाणी काम करताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना जी काय मदत करता येईन ती केली जाईल. असेही त्यांनी आश्वासन दिले होते. यानुसार मंत्री केसरकर यांनी स्वखर्चातून या चारही खलाशांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.