-10.2 C
New York
Tuesday, January 21, 2025

Buy now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली | जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.

योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेतून सरकार महिलांना मदत करणार आहे. योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. २१-६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील. जुलै २०२४ पासून ही योजना सुरु होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता २ महिन्यांनी मुदत वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. पण आता ही मर्यादा 65 वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे. त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत कमी कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य नव्हतं. सेतू केंद्रांवर झुंबड उडाली होती. तसंच डोमिसाईल मिळण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतो. यावर टीका होऊ लागल्यानंतर आज सरकारने या योजनेत बदल केले आहेत.

योजनेची मुदत २ महिन्यांनी वाढवली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ घेणास मतद होणार आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. मध्यप्रदेश सरकारने लाडली योजना सुरू केल्यामुळे लोकसभेत यश मिळाल्याचं मानलं जातं. येत्या काही महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा महायुतीला कितपत फायदा होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!