पालयेवाडी तरुण उत्साही मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दामोदर आंबेरकर, माजी अध्यक्ष सुहास नामदेव आंबेरकर, गोकुळ शंकर आंबेरकर, राहुल भगवान आंबेरकर, संजय दामोदर आंबेरकर, संकेत विठोबा जुवाटकर यांनी माहिती देताना सांगितले कि, पडवणे पालये येथे जानेवारी/फेब्रुवारी या महिन्याच्या दरम्यान जलजीवन मिशन योजनेतर्गत पाणी साठवण टाकी बांधणे व पाईप टाकणे हे काम करण्यात आले आहे. हे काम करताना या कामाच्या ठेकेदाराने रस्त्याचा कडेला असलेल्या गटारात पाईप टाकण्यासाठी खोदकाम केले. याला ग्रामस्थानी विरोध केला नाही. खोद काम झाल्यानंतर गटार सुस्थितित करण्यात यावे असे ठेकेदार व अधिकारी वर्गाला सांगण्यात आले होते. त्यांनी गटारातील मोठे दगड बाजूला करून पावसात त्रास होणार नाही असे काम करून दिले जाईल असे सांगितले.
परंतु पाऊस पडून महिना झाला तरीही गटारातील दगड न काढल्यामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. यामुळे पालयेवाडी घाटी रस्ता वाहून गेला आहे. येथील मोरीही तोडण्यात आली असून ती बुजल्यामुळे पाणी रस्त्यावर येत आहे. येथील अवघड वळणावर चर पडले आहेत. त्यामुळे महिनाभर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ठेकेदाराने अआश्वासन दिल्याप्रमाणे काम न केल्यामुळे ही समश्या निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सुहास आंबेरकर व प्रदीप आंबेरकर यांनी तरुण भारत संवादशी बोलताना, पालयेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधन्यात आले आहे. येथील विकास कामांचे निवेदनही स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी त्यांना दिले आहे.
पडवणे ग्रामपंचायत यांनाही या प्रश्नबाबत निवेदन देण्यात आले आहे. एसटी बस सेवा बंद झाल्यामुळे येथील वयोरुद्ध, विद्यार्थी वर्गाला देवगड किंवा अन्य ठिकाणी जाणे मुशकील बनले आहे. जल जीवनचे काम होऊन तीनचार महिने उलटले तरीही ठेकेदाराने ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे काम केलेलं नाही. उलट येथील लोकांची गैरसोय केली आहे. याला नेमके जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थानी व्यक्त केला आहे. पालयेवाडीकडे जाणारी एसटी बस सेवा सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ठेकेदार रस्ता दुरुस्त करीत नाही तोपर्यंत येथील वाहतूक सुरु होणार नाही अशी विदारक स्थिती दिसत आहे. जलजीवन मिशन विभागाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान पडवणे गावातील रस्त्याची दुरावस्था झाली असून गेली अनेक वर्षे या गावाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून आले आहे. पडवणे-पालये गाव विकासापासून वंचित असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थानी बोलताना दिली आहे.
पडवणे पालयेवाडी येथील रस्त्याची गटार खोदाई नसल्याने रस्ता वाहून जाण्याच्या स्थितीत..