कणकवली | मयुर ठाकूर : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी बुधवारी कणकवली तालुक्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एक तासात आणखीन आठ टक्के मतदान वाढल्याने प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात सरासरी ७८.६५ टक्के मतदान झाले. तालुक्यातील ३८६० पैकी ३०३६ मतदारांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत.महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे तर महाविकासाआघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर निवडणूक लढवीत आहेत.
कणकवली तालुक्यात ३८६० मतदार आहेत. त्यासाठी तालुक्यात सहा मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली होती. या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली होती. तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटमध्ये दोन मतदान केंद्रे, कासार्डे माध्यमिक विद्यालय येथे एक केंद्र, कणकवली तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांचे दालन व संगणक कक्ष अशी दोन मतदान केंद्रे तर कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात एक अशी एकूण सहा मतदान केंद्रे होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कासार्डे मतदान केंद्रांवर ५३७ मतदारांपैकी ४२४ , कणकवली शहरातील तीन केंद्रांवर २४५० पैकी १६३७ मतदारांनी हक्क बजावला. फोंडाघाट येथील दोन केंद्रांवर ८७२ मतदारांपैकी ६४२ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला होता. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी जगदिश कातकर,कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार मंगेश यादव, शिवाजी राठोड, निवडणूक नायब तहसीलदार प्रिया हर्णे, शिरस्तेदार गौरी कट्टे आदी अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, कर्मचारी, पोलिस, मायक्रो ऑब्झरव्हर, शिपाई असे प्रत्येकी ७ कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.तर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.