सावंतवाडी : आंबोली वर्षा पर्यटन हंगामात मुख्य धबधब्यासह अन्य पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सावंतवाडी पोलिस “सतर्क” आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली. दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात आवाज करत गाड्या चालविणार्या धुमबाईक स्वारांवर समवेत काळ्या काचा लावून गाड्या फिरविणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुचना स्थानिक अधिकार्यांना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. आंबोली पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर श्री. कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आंबोली पर्यटन स्थळावर येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यात येणार असून मद्यधुंद अवस्थेत धागडधिंगा घालणार्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेेळी श्री. कांबळे पुढे म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात धुमबाईकस्वारांचा त्रास वाढत आहे. मोठ्या आवाजाच्या गाड्या चालवून सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले जाते अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर आपण स्वतः रस्त्यावर उतरून तसेच अधिकार्यांच्या माध्यमातून कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.