कणकवली | मयुर ठाकूर : मुलुंड, मुंबई येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘अस्मि’ प्रतिष्ठानच्या वतीने सौ. अस्मिता जयप्रकाश लब्दे यांच्या स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’ यावर्षी (२३/०५/२०२३ बुद्ध पौर्णिमा) गोपुरी आश्रमास प्राप्त झाला आहे. गोपुरी आश्रमामार्फत सातत्याने सुरू असलेल्या विविध स्वरूपातील सामाजिक व रोजगार विषयक कार्याचा गौरव व्हावा याकरिता हा अस्मि सन्मान गोपुरी आश्रमाला देताना मला विशेष आनंद होत आहे असे उद्गार अस्मि प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश लब्दे यांनी काढले. त्यांनी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर व विद्यमान सचिव श्री विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्याकडे अस्मि सन्मान सुपूर्त केला. २५ हजार रुपये धनादेश असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
गोपुरी आश्रमाला ७६ वर्ष पूर्ण झालेली आहेत. कोकण गांधी पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७६ वर्षांपूर्वी सुरू केलेली गोपुरी आश्रम ही संस्था आजही कार्यरत आहे. वर्तमान व भविष्यकाळातील पिढीला संस्काराच्या दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी गोपुरी आश्रमासारख्या संस्थां भविष्य काळात सातत्याने कार्यरत राहायला हव्यात यासाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवर काम करणाऱ्या मंडळींनी या संस्थेला आर्थिक हातभार लावण्यासाठी सहकार्य करायला हवे असेही यावेळी बोलताना जयप्रकाश लब्दे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी दिनेश पडवेकर, आशालाता पडवेकर, गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते सदाशिव राणे, कवि श्रेयश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. गोपुरी आश्रमाला मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.