20 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

सावंतवाडी पालिकेची रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

सावंतवाडी : भाजी मार्केटमध्ये आणि रस्त्यावर अशा दोन्ही ठिकाणी स्टॉल घालून बसणार्‍या विक्रेत्यांवर आज सावंतवाडी पालिकेने कारवाईचा बडगा उभारला. आंब्याच्या हंगामात बाहेर बसण्यात परवानगी देण्यात आली होती, परंतु मुदत वाढवून देऊन सुद्धा पुन्हा व्यापारी ठाम राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे म्हणणे आहे. मात्र पालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत व्यापार्‍यांत नाराजी असून आंबा हंगाम संपेपर्यंत किंवा वटपौर्णिमेनिमित्त तरी बाहेर बसण्याची परवानगी द्या, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. मात्र वाहतुकीला होणारा अडसर लक्षात घेता ही कारवाई करण्यात आली आहे, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

दरम्यान मुदत वाढीच्या कोणत्याही सूचना आल्या नसल्याने मुख्याधिकाऱ्यांनी स्टॉल खाली करून घेण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत, त्यानुसार आपण ही कारवाई करत आहोत, अशी माहिती कर निरीक्षक रचना कोरगावकर यांनी दिली. त्यामुळे लवकरच रस्त्यावर व्यापारासाठी बसणार्‍या सर्व व्यापाऱ्यांचे मार्केटमधील स्टॉल हटवणार आहोत, असे त्या म्हणाल्या. यावेळी काही व्यापाऱ्यांकडून याला विरोध करण्यात आला, मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मार्केटमधील स्टॉल हटविले. त्यामुळे लवकरात लवकर मार्केटमध्ये येऊन व्यापार करा अन्यथा सर्व स्टॉल हटवणार आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी पालिका प्रशासनाचे कर्मचारी दिनेश भोसले, रिजवान शेख उपस्थित होते. याबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मार्केटमध्ये आंब्यांना गिऱ्हाईक नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर बसावे लागत आहे. आंब्यांचा सीजन अद्याप पर्यंत संपला नाही, त्यामुळे पालिकेकडे आठ दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे.

मात्र त्यांच्याकडून आक्रमक भूमिका घेतली गेली असली तरी आम्ही पुढचे आठ दिवस इथेच व्यापारासाठी बसणार आहोत असे ते म्हणाले. यावेळी अनिल मठकर, विमल पावसकर, आरती मठकर, श्याम सांगेलकर, राजा खोरागडे, दिपाली राऊळ, सुलभा जामदार, सुषमा राऊळ, रेश्मा खोडागरे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!