13.9 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने ३ दुचाकींना उडवलं, ३ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी

कोल्हापूर: कोल्हापुरातील सायबर चौकात कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. एका चारचाकी गाडीने भरधाव वेगात येत ३ दुचाकीवरील ७ जणांना उडवले असून यामध्ये ३ जण ठार झाले आहेत. तर अन्य ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून परिसरात काचांचा आणि तुटलेल्या दुचाकीचा खच पडला आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून भरधाव चारचाकीने तीन दुचाकींना उडवत गेल्याचे दिसत आहे. दरम्यान गंभीर जखमींना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील सायबर चौकात दुपारी अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला. शिवाजी विद्यापीठाकडून सायबर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर चारचाकी स्यांट्रो कारवरील वसंत चव्हाण (७२) या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ही चार चाकी भरधाव वेगाने सायबर चौकात दाखल झाली आणि पुढे असलेल्या तीन दुचाकी स्वारांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीस्वार काही फूट अंतरावर जाऊन पडले. तर चार चाकी जाऊन पुढे खांबावर धडकून उलटून पडली.

यामध्ये कार चालकासह हर्षद पाटील, प्रदीप पाटील या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर धनाजी शंकर कोळी, शुभांगी धनाजी कोळी, समर्थ पंकज पाटील, जयराज पाटील, प्रथमेश पाटील, मयूर खोत हे सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सी पी आर रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कार चालक असलेले वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठातील माजी प्रकुलगुरू असून ते ७२ वर्षाचे होते. त्यांच्या डोळ्यावर उपचार सुरू होते. यांचा उपचार सुरू असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

तर दौलत नगर येथे राहणारे हर्षद सचिन पाटील, प्रथमेश सचिन पाटील आणि जयराज पाटील हे तरुण राजाराम तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील हर्षद पाटील हा आता दहावी मध्ये शिकत होता. मात्र त्याचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. अपघात झाला यावेळी रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने मृतांना आणि जखमीना टेम्पो ट्रॉलीत आणि रिक्षात घालून न्यायची वेळ प्रत्यक्षदर्शींवर आली. काही वेळातच घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, डी वाय एस पी अजय टेके, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत पंचनामा सुरू केला. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या अपघाताची दाहकता पाहून कोल्हापुरकरांच्या काळजाचा ठोका चुकला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!