वेंगुर्ले | प्रतिनिधी : येथील बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली होडी उलटली. यात ४ खलाशी बेपत्ता झाले असून तिघांनी पोहून किनारा गाठला. ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समुद्रात घडली. ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यातील १ खलाशी रत्नागिरीतील तर ३ खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली. यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे जीवाची परवा न करता पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र चार खलाशी अद्याप पर्यंत सापडलेले नाहीत. ते पाण्यात बेपत्ता झाले आहेत. त्या चार खलाशांमध्ये एक खलाशी रत्नागिरी येथील तर तीन खलाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याचे समोर येत आहे. रात्री वादळी वाऱ्याबरोबरच वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्याच अंधाऱ्या रात्री मध्ये ही दुर्घटना घडली आहे. तात्काळ अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. मात्र रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही. आज सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप पर्यंत बुडालेली होडी आणि चारही खलाशांचा पत्ता लागलेला नाही. वेंगुर्ले पोलीस आणि स्थानिक मच्छीमार अजूनही शोध कार्य करत आहेत.