कणकवली : जानवली नदीलगत असलेल्या गावांच्या नळ योजना बंद अवस्थेत असल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा फटका बसत असल्याने काही दिवसांपूर्वीच नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत व साकेडी येथील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर यांनी तहसीलदार व संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संबंधित विभागाकडे ही पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रश्नी तात्काळ दाखल घेत जानवली नदीपात्रात हरकुळ धरणाचे पाणी सोडण्यात आले. मुबलक प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने ऐन उन्हाळ्याच्या वेळेतच पाणीटंचाईच्या काळात नदीपात्र पाण्याने पूर्णता भरून गेले आहे. यामुळे नागवे व साकेडी यासह जानवली व त्याखालील भागांचा देखील पाणी प्रश्न येत्या काळात सुटणार आहे.
जानवली नदीपात्रा लागत नागवे व साकेडी या ठिकाणी येणारी नदीपात्रे पाण्याने तुडुंब भरली आहेत. त्यानंतर हे पाणी येत्या दोन दिवसात जानवली गावाच्या खाली पर्यंतच्या कोंडींमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या नदीलागतच्या गावांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. नागवे गावच्या नळ योजनेच्या दोन विहिरी व साकेडी गावची एक वीहिर या नदीपात्रालगत आहे. तसेच त्याखाली जानवली, कलमठ भागापर्यंत नदी लगत देखील मोठ्या प्रमाणावर नळ योजनेच्या विहिरी व जलस्रोत असल्याने पाण्या अभावी नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता नदीपात्र पाण्याने भरल्याने हा त्रास दूर होणार आहे.