वैभववाडी : तालुक्याला विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने झोडपून काढले. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर कुसूर बाजारवाडी येथे रस्त्यावर विदयुत खांब पडल्यामुळे सुमारे अर्धा तास वैभववाडी उंबर्डे राज्यमार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. तर वैभववाडी येथील ट्रान्सफार्मर जळल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घर अथवा गोठ्याचे नुकसानीची नोंद नव्हती. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
गेले काही दिवस तापमाणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वादळी पाऊस सुरु झाला. या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उमळून पडली. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तर कुसूर बाजारवाडी येथे विदयुत खांब रस्त्यावर पडल्यामुळे सुमारे आर्धा तास वैभववाडी उंबर्डे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज खांब बाजूला करून वाहतूक सुरु केली.
तर वैभववाडी शहरातील विजेचा ट्रान्सफॉर्मर बंद झाल्यामुळे शहरातील वीज पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता. त्याच प्रमाणे आखवणे पुनर्वसन येथे झालेल्या वादळाने झाड पडल्यामुळे विदयुत वाकल्यामुळे विदयुत पुरवठा खंडीत झाला आहे.
तसेच पुनर्वसन गावाठाणातील राजेंद्र मोरे, विश्वनाथ नागप, सुनील पडिलकर, रघुनाथ नागप, बयाजी जिनगारे, शिवाजी जिनगरे यांची काजुची झाडे वादळाने उन्मळून पडल्यामुळे यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.