19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार व विचार युवा पिढीने आत्मसात केले पाहिजेत – प्रा. सोमनाथ कदम

कणकवली | मयुर ठाकूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार व विचार युवा पिढीने आत्मसात केले पाहिजेत. डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांचे युवा पिढीने वाचन केले पाहिजे. सिंपन प्रतिष्ठानचे कार्य वाखाण्याजोगे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर संघटनांनी घेतला पाहिजे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सोमनाथ कदम यांनी केले.

सिंपन प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेतर्फे मराठा मंडळ नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केलेला होता. याप्रसंगी श्री. कदम बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, कार्याध्यक्ष डॉ. संदीप कदम, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, खजिनदार दत्ता पवार, जानवलीचे सरपंच अजित पवार, वास्तूविशारद प्रथमेश पडवळ, चित्रकार नामानंद मोडक, बी. एस. कदम, प्रमोद नाईक, प्रा. वर्षा कदम, व्ही. डी. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संदीप कदम म्हणाले, १४ मे १९३८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कणकवलीत आगमन झाले होते. यानिमित्त यादिवशी डॉ. आंबेडकर यांच्या परिवर्तन विचारांना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी सिंपन प्रतिष्ठानतर्फे २०१८ पासून दरवर्षी १४ मे हा दिवस परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. आंबेडकर यांचे ज्या-ज्या ठिकाणी पदस्पर्श त्याठिकाणी त्यांची स्मारके बांधण्यात आली आहेत. मात्र, कणकवलीत त्यांचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. हे स्मारक उभारण्यासाठी सिंपन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. सिंपन प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले ६ वर्षे सेवाभावी काम सुरु आहे, असे कदम यांनी सांगतानाच संस्थेच्या आजवरच्या प्रवासाची माहिती दिली.
बाळकृष्ण जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांची स्मारके उभी राहिली आहेत. मात्र, कणकवली त्यांचे स्मारक उभे राहू शकले नाही. हे स्मारक उभारण्यासाठी सिंपन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून जानवली येथील जागेत डॉ. आंबेडकर यांचे लवकरच स्मारक बांधले जाणार आहे.

अनंत तांबे, र. शा. पेडणेकर, व्ही. टी. जंगम, सूर्यकांत राणे, जनार्दन जाधव (मरणोत्तर) यांना मान्यवरांच्या हस्ते सिंपन अमृत सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. सूर्यकांत राणे यांचा पुरस्कार गोपी पवार यांनी तर जनार्दन जाधव यांच्या पुरस्कार त्यांच्या पत्नी यांनी स्वीकारला. प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणार पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी तर प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा सिंपन विजयी भव्य युवा पुरस्कार अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गज्वी यांचा पुरस्कार नाट्यकर्मी अरुण कदम यांनी स्वीकारला. एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या समीर कदम याचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. अजित पवार, प्रथमेश पडवळ, नामानंद मोडक यांच्या सिंपन प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला. व्ही. टी. जंगम, अनंत तांबे, समीर कदम यांनी मनोगते व्यक्त केली. आरंभी तथागत भगवान गौतम बौद्ध यांची मूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांचे स्वागत अनिल तांबे यांनी केले. या कार्यक्रमात जानवली बौद्धवाडीतील येथील कलाकारांनी स्वागतगीत व नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. तर संदेश तांबे यांनी आपल्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!