वेंगुर्ला : मांडवीखाडी मद्ये पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर आज मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला असून त्याच्या सोबत असलेला दुसरा मुलगा सुदैवाने खाडीत असलेल्या मच्छिमारामुळे बचावला आहे.
तळवडा येथे आपल्या मामाकडे हा मुलगा आला होता. आज आपल्या मावशीसोबत वेंगुर्ला येथे फिरण्यासाठी गेला होता. झुलत्या पूलानजिक असलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आरवला नाही. त्यामुळे दोघे हे लहान मुलगे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छिमार बांधवाने तळवडे येथील १५ वर्षीय गौरव देवेंद्र राऊळ या मुलाला वाचवले. मात्र, दुसरा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन बुडाला आहे. सध्या त्याचा शोध खाडी पात्रामध्ये सुरू आहे. दरम्यान खाडी किनारी नातेवाईक तसेच पर्यटकांसाहित स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी सहाय्यक पोलीस नीरक्षक प्रशांत जाधव, पोलीस हवालदार योगेश वेंगुर्लेकर, पांडुरंग खडपकर, एस आर कुबल, पोलीस मित्र निकेश नांदोस्कर यांनी खाडीत बोटीतून जाऊन पाहणी केली. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी परितोषिक कंकाळ यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे.
सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून अनेक पर्यटक या झुलत्या पुलाला भेटी देत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच मार्गदर्शक फलक असणे आवश्यक आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांतून होत आहे.
दरम्यान स्थानिक मच्छिमार यांनी शोधाशोध करूनही तो सापडला नाही. काळोख पडल्यामुळे शोध कार्य थांबविण्यात आले.