मुंबई : मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला काय दिले, याचे उत्तर द्यावे. निवडणुका आल्या की यांचे पोपट मुंबई वेगळी केली जाणार असल्याची भाषा करतात. कारण यांच्या डोक्यातच षड्यंत्र आहे. तिथे भुसा भरला आहे. निवडणुका आल्या की जाती- जातीत, भाषेत वाद निर्माण केले जातात. जुन्या मुंबईतील मराठी माणूस बेघर का झाला याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी टीकेची झोड उठवली.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांच्यासाठी तर उत्तर पूर्व मुंबईत मिहिर कोटेचा यांच्या प्रचारासाठी अनुक्रमे साकीनाका आणि विक्रोळीत फडणवीस यांची जाहीर सभा झाली. लोकसभेची ही निवडणूक गल्लीसाठी नाही तर दिल्लीतील नेता निवडायची आहे. भाजप उमेदवाराला दिलेले मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणार आहे. आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी आहेत. काँग्रेसच्या इंडी आघाडीचे कोण, हे सांगता येत नाही. ठाकरेंचा सकाळचा भोंगा म्हणतो पाच वर्षात पाच पंतप्रधान देऊ. या देशाचे पंतप्रधान पद म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ आहे का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपल्या दोन्ही भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसने हेमंत करकरेंच्या हौतात्म्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसवाले हे सर्व बोलत असताना उद्धव ठाकरे मात्र तोंड बंद करून बसले आहेत. त्यांना आता सर्वसामान्यांची चिंता राहिली नाही. ठाकरे आता मूठभरांची चिंता करत आहेत,असा आरोप त्यांनी केला.