सिंधुदुर्ग : गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रानमेवा दरवर्षी दुर्मीळ होत चालला आहे. ग्रामीण भागात बोरं, करवंदे, तोरण यासारख्या फळांचा रानमेवा मोठ्या प्रमाणात होता. सततच्या वणव्यांच्या घटनांमुळे वनसंपदा धोक्यात आल्याने रानमेवा नष्ट होत आहे. काही वर्षांपूर्वी आंबट-गोड बोरं, करवंदे, तोरणं अशा अनेक फळांची रेलचेल असायची. परंतु ग्रामीण भागात रानमेव्यांची झाडे कमी होत आहेत. बाजारात, चौकात, शाळेबाहेर रानमेवा फळांचे विक्रेते दिसायचे. ही फळे घेण्यासाठी शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात गर्दी करायची. अलिकडे गावरान बोरांची जागा आता इलायची बोरांनी घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून झाडांची कत्तल होत असल्याने या भागात बोरं, करवंदे कमी प्रमाणात दिसत आहेत.
ग्रामीण भागातील महिला ही फळे बाजारात विकतात. परंतु खूप कष्ट करून काढलेल्या फळांना कमी प्रमाणात भाव मिळतो. या फळांना शहरी भागात मोठी मागणी असली तरी ग्रामीण भागात झाडांची संख्या कमी होत असल्याने फळे कमी प्रमाणात आहेत.