सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. निवडणूक काळातही त्याचे दर्शन घडत असते. मग ते जिवलग मित्र असले तरीही एकमेकांविरुद्धच्या विचारसरणीमुळे वेगवेगळ्या विचारांना पाठिंबा देतात. निवडणुकीच्या धामधुमीत विचाराने दुरावलेल्या मित्रांना एकत्र करणारे विविध संदेश सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. “झाले इलेक्शन, जपा रिलेशन” अशा संदेशांचा यात समावेश आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान ७ मे रोजी झाले. ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याला अजून बराच काळ आहे. निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र यावेत यासाठी काही जणांकडून विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. पूर्वी मैत्रीच्या रूपाने जोडलेली एकमेकांची नाळ पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतभिन्नतेमुळे दुरावलेली नाती, मैत्री पुन्हा पूर्वीप्रमाणे जवळ यावी, त्यात आपुलकीची किनार असावी, यासाठी सामाजिक संदेश देत काही जणांकडून आवाहन केले जात आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश
निवडणूक संपली, आता आपल्या जुन्या मैत्रीच्या पक्षात या. कारण, गेल्या एका महिन्यापासून मित्रांची मित्रांसोबत बंडखोरी झाली होती. आता आपल्या मित्रांशी आघाडी युती करा, हेच आपले मैत्रीचे राजकारण होय. असा सामाजिक व तितकाच प्रबोधनात्मक संदेशही व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम व फेसबुकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रसारित केला जात आहे.