सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : वर्षा बाहेर तासनतास उभा रहाणारा मी नाही. आमदारांचा सातत्याने अपमान होत असल्यानेच आम्ही स्वाभिमानाने बाहेर पडलो. कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. त्यामुळे कोकणी माणसाच्या स्वाभिमानाला ललकारू नका व उगाच कुणाला बदनाम करायची हिंमत करू नका. अन्यथा सगळं बाहेर काढावं लागेल असा गर्भीत इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आ. वैभव नाईक यांना दिला.
दरम्यान, मागच्यावेळी समोरील उमेदवाराचा अर्ज बाद झाला अन्यथा आज चित्र वेगळं असतं. मी त्यावेळी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेमुळेच तुम्ही निवडून आलात हे विसरू नका. उगाच माझ्या वाटेला जाऊ नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत मला तुमच्या मतदारसंघात यावं लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, आम्ही आमदारांच्या स्वाभिमानासाठी बाहेर पडलो. कोकणी माणूस कधीही लाचार होणार नाही. मी कोणाकडूनही एक रुपया देखील घेतला नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही शिर्डीला साईबाबांसमोर या व बोला, असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले.
आमदार हे अडीच लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आमदारांचा अपमान म्हणजे त्या मतदारांचा अपमान असतो. नारायण राणे यांनी मंत्री, मुख्यमंत्री असतानाही मला सन्मानाची वागणूक आम्हाला दिली. आमच्यातील संघर्ष हा वैचारीक होता. मात्र विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नेहमीच एकत्र आलो. विकासाच्या व स्वाभिमानाच्या मुद्द्यावरच आम्ही पुन्हा भाजप सोबत गेलो. आमदार वैभव नाईक देखील आज आमच्यासोबत असू शकले असते. पण, त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे ते एकनाथ शिंदेंसोबत आले नाहीत असा गौप्यस्फोट केसरकरांनी केला.
स्व. बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही तो निर्णय घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगूनच आम्ही निघालो. आम्ही लाचारी सहन करणारे नाही. वैभव नाईक यांनी आमच्यावर बोलू नये, आदित्य ठाकरेंनीही बोलू नये. मी साईबाबांचा भक्त आहे. त्यामुळे कुणाबद्दल तुम्ही बोलता याची नैतिकता बाळगा. आमची लढाई स्वाभिमानाची होती ती लढाई स्वाभिमानानं लढली आहे. त्यामुळे उगाच आरोप करू नका
अन्यथा मला देखील सगळं बाहेर काढावे लागेल असा इशारा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिला.