पोईप | संजय माने : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगल्या प्रकारे मतदान करावे, महायुतीचा धर्म प्रत्येक कार्यकर्त्याने पाळावा, असे आवाहन शिवसेनेचे मालवण कुडाळ मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी पोईप येथे केले.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाची बैठक पोईप येथील शाखाप्रमुख नारायण उर्फ पप्पू राणे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बबन शिंदे यांच्या समावेत शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर, विभाग प्रमुख अल्पेश निकम, पराग खोत, शाखाप्रमुख नारायण उर्फ पप्पू राणे, बाळाजी नाईक, चंद्रकांत नाईक, नाना तावडे, सुशील जाधव, स्वप्निल पोईपकर, बाळा पोईपकर, महेश वेंगुर्लेकर, समीर पालव, शरद पालव, बाळा गोसावी, मंगेश नाईक, बाबू राणे यांसह शिवसेना व भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते.
यावेळी बबन शिंदे म्हणाले, महायुतीत असलेले मतभेद वरिष्ठ पातळीवर मिटवण्यात आले असून वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार शिंदे शिवसेना गटाकडून मालवण कुडाळ मतदार संघातील प्रत्येक गावात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक गावात भाजप कार्यकर्ते प्रचार करतीलच परंतु, महायुतीचा धर्म पाळून आपण शिवसेनेच्या वतीने चांगले मताधिक्य देण्यासाठी समन्वयातून काम करावे, असेही शिंदे म्हणाले.
यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन करून मतदानाचे आवाहन केले. दरम्यान, रविवारी येथे होणाऱ्या शिवसेनेच्या प्रचार बैठकीसाठी माजी खासदार निलेश राणे हे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राजा गावकर यांनी दिली.