28.9 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

गवारेड्याची कारला जोरदार धडक | कारचे मोठे नुकसान

देवगड | प्रतिनिधी : कणकवलीहुन जामसंडेच्या दिशेने जाणाऱ्या कारला गवारेड्याची जोरधार धडक बसल्याने कारचे लाखोचे नुकसान झाले आहे.ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी रात्री ७:३० ते ८ वा. च्या दरम्यान देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव राक्षसघाटी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे सुपुत्र जामसंडे येथील प्रकाश गोगटे यांच्या मालकीची एमएच ०७ एबी २१९२ ही सियाज कार घेऊन चालक सुहास तांबे हे आपले काम आटपून कणकवली येथून जामसंडेच्या दिशेने जात असताना शिरगाव राक्षसघाटी येथे शासकीय तांत्रिक विद्यालय जवळ अचानक धावत आलेल्या गवारेड्याने जोरदार धडक दिली. गव्याने दिलेली धडक इतकी जोरदार होती की, ड्रायव्हरने सीट बेल्ट लावला होता. गव्याची धडक बसतात एअरबॅग उघडल्याने जीवित हानी झालेली नाही. मात्र या गवा रेड्याच्या धडकेमुळे गाडीच्या दर्शनी भागाच्या काचेसह, हेडलाईट बोनेटसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच डाव्या बाजूच्या दोन्ही दरवाजांचे नुकसान झाले आहे. गवारेडयाने कारला दिलेल्या धडकेत चारचाकी कारचे सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर येथील स्थानिक ग्रामस्थ संभाजी साटम ,मंगेश लोके, संतोष फाटक यांच्यासह शिरगाव मधील ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली.

देवगड नांदगाव मार्गावरील ही दुसरी तर शिरगाव परिसरातील तिसरी घटना आहे. आणि या तिन्ही घटना एक एक महिन्याच्या फरकाने घडल्या आहेत. वनविभागाला कळवून देखील याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. आता ही तिसरी घटना घडली आहे.त्यामुळे आतातरी वनविभाग याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून ग्रामस्थांची भीती दूर करणार आहे की अजूनही अशा घटनांची वाट वन विभागाकडून बघितली जाणार आहे. अशा संतप्त सवाल शिरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!