अंतर्गत दुरुस्ती संथगतीने असल्याने वीस दिवस कक्ष बंदच : ‘बेड’ कमी पडू लागले
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत दुरुस्तीसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील बंद केलेला पुरुष कक्ष अद्यापही बंद आहे. दुरुस्तीचे संथ गतीने सुरू असलेले काम पाहता हा कक्ष रुग्णसेवेत कधी दाखल होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचा परिणाम ‘ रुग्णालयाच्या क्वान्टिीटी’ वर झालाय. ‘बेड’ उपलब्ध नसल्याने रुग्णांना अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये पाठविण्याचीही वेळ आली आहे. शौचालये, बाथरुम, खिडक्या आदींची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयाचा पुरुष कक्ष २० दिवसांपूर्वी बंद करण्यात आला. तेव्हापासून सर्व रुग्ण स्त्री कक्षात ठेवण्यात येत आहेत.
सध्या रुग्णसंख्या बरीच असल्याने स्त्री कक्षही पूर्ण भरला आहे. रुग्णालयात प्रसुती रुग्णांसाठी कक्ष आहे. तेथेही अनेक रुग्ण आहेत. पुरुष रुग्ण ‘अॅडमिट’ करण्याची वेळ आल्यास त्यांना ठेवायचे कुठे? ‘बेड’ अभावी अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालयात ‘रेफर’ करण्याची वेळ आलीय.
त्यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही मनःस्ताप सहन करावा लागतोय. याबाबत दुरस्तीचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे.