तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आवाहन
कणकवली – भारत देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने शेतकरी बांधवांकरिता ॲग्रीस्टॅक ह्या योजनेंतर्गत फार्मर आयडी तयार करण्यास सुरूवात केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे स्वतःचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
हा फार्मर आयडी तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पीक कर्ज मिळवण्यासाठी आणि शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यामध्ये सुलभता येईल. पीक विमा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात देखील सुलभता येणार आहे. किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणी करणे ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल. शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले विविध संस्थांकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये नाविन्यपूर्ण वाढ होणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडीचा लाभ घेतल्यामुळे त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व प्रक्रिया अधिक सुलभ होतील. फार्मर आयडी हा शेतकऱ्यांसाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो त्यांच्या डिजिटल प्रोफाइलशी जोडला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध फायदे मिळतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऍग्री स्टॅक योजना राबविण्यात येत असून आजपर्यंत एक लाख एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वाधिक फार्मर आयडी कणकवली तालुक्यामध्ये तयार केले गेले आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यात 19000 पेक्षा जास्त फार्मर आयडी तयार झाले आहेत. यामध्ये सर्व CSC सेंटर, तलाठी यांनी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन या योजनेची प्रसिद्धी केली व वाड्यांवर जाऊन नोंदणी साठी कॅम्प देखील घेतले आहेत.
तरी तालुक्यातील उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी आपले ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करून घ्यावा. जवळच्या सीएससी सेंटर मध्ये अथवा ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाशी संपर्क करून स्वतःचा फार्मर आयडी तयार करावा.
स्वतःच्या मोबाईलवरून सेल्फ रजिस्ट्रेशन माध्यमातून देखील फार्मर आयडी तयार करून घेता येईल जेणेकरून भविष्यात सर्व योजनांचा लाभ मिळण्यास सुलभता येईल, असे आवाहनही श्री देशपांडे यांनी केले आहे.