29.8 C
New York
Sunday, July 6, 2025

Buy now

महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवतोय का..? – हर्षवर्धन सपकाळ

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हा भाषेचे मार्दव वाढवणारा आहे. वि स खांडेकर, मंगेश पाडगावकर, मधू मंगेश कर्णिक, जयवंत दळवी असे सहित्यिक या जिल्ह्याने दिले. पण आता या जिल्ह्यातून रोज शिवराळ भाषा येथील मंत्री आणि आमदार वापरत आहेत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला काळिमा फासणारी गोष्ट आहे. याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही धिक्कार करतो. या विरोधात लढण्याची भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा आणि या सगळ्या विरुद्ध लढण्याचा जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. कुडाळ येथे ते पत्रकार पररिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार हेकेखोर पद्धतीने राज्य चालवीत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हा आमचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा तीच परिस्थिती असल्याचे श्री. सकपाळ म्हणाले. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची नव्याने सूत्रे हाती घेतल्यावर ज्या ठिकाणी काँग्रेस कमजोर आहे, अशा जिल्ह्यांपासून आपला महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्यातील पहिले ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्हा होते. त्यांनी आज कुडाळ मध्ये माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना श्री. सपकाळ म्हणाले, राणेबंधूंकडून हे जे विचित्र आणि विकृत बोलले जात आहे त्याचा धिक्कार त्यांच्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. दुसरीकडे या जिल्ह्यातुन बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू असे एका पेक्षा एक सरस आणि सभ्य खासदार निर्माण झाले. पण आता जिल्ह्यातील आमदारांची परिस्थिती विचित्र आहे. एक मंत्री आहेत. एक सैराट आहेत तर तिसऱ्या आमदारांना मंत्री न केल्याने ते रुसून बसलेले आहेत. या सर्व आमदारांची कीव यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबद्दल खतं व्यक्त करतो असे श्री. सकपाळ म्हणाले. महाराष्ट्रातील काही मंत्री आहेत जे रोज महाराष्ट्रधर्म नासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधानिक मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. त्याचा निषेध आम्ही करतो. आमच्या पक्षात आला नाहीतर निधीच देणार नाही या पालकमंत्री यांच्या वक्तव्याचा देखील आम्ही निषेध करतो. बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडावते यांचा विचार, संविधानाचा विचार, छत्रपती शिवरायांचा विचार, डॉ. आंबेडकरांचा विचार हा सगळा विचार बाजूला ठेवून, भाजपकडून नवीन पायंडा पाडला जात आहे. हा विचार आपल्या लोकशाहीला कुठे घेऊन जाणार आहे, हा मोठा एक प्रश्न आहे. या करता लढण्याची भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरण्याचा आणि या सगळ्या विरुद्ध लढण्याचा जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा दहशतवाद आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद आहे. सिंधुदुर्गात भ्रष्टाचार आणि पक्षीय भूमिका याला महत्व दिले जात आहे. महाराष्ट्रातही तेच केले जात आहे. महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, हा आमचा प्रश्न आहे. तर सिंधुदुर्गात मानसिक दिवाळखोरीतुन येथील उच्च सांस्कृतिक परंपरेला हरताळ फासणारे आणि त्याच्या विपरीत काम करणारे पालकमंत्री काम करत आहेत का, हा देखील एक आमचा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म नासविण्याचा जो प्रयत्न होतोय तो अत्यंत विदारक आहे. त्यामुळे आगामी काळात सिंधुदुर्गसह महराष्ट्रात आम्ही पक्षाची पुनर्बांधणी आणि संघर्षाची भूमिका स्वीकारून पुढे जाणार असल्याचे श्री. सकपाळ म्हणाले. भारताचा डीएनए हाच कॉंग्रेस पक्षाचा डीएनए आहे. त्यामुळे भाजपच्या दंडेलशाहीशी फॅसिझमशी आणि त्यासोबत भांडवलदारांना सोबत घेऊन जे आज राज्याचा कारभार चालवताहेत त्या विरोधात एकच पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचा कार्यकर्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सम्पूर्ण भारतात आपलं स्वत्व जपून आहे. नारायण राणे सुद्धा त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती म्हणून काँग्रेसमध्ये आले. १२ वर्ष काँग्रेस मध्ये थांबले. पण जाताना सगळं घेऊन गेले. आता सुद्धा सत्ता काँग्रेस कडे नाही म्हणून येथिल कार्यकर्ते अन्य पक्षात गेले आहेत. मागच्या ज्या काही चुका असतील त्या पासून धडा घेऊन आमची पुढची वाटचाल राहणार आहे. माझ्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात मी सिंधुदुर्ग पासून केली त्यामुळे काँग्रेस मजबूत करण्यासाठी हे एक सूचक पाऊल असल्याचे श्री. सपकाळ म्हणले.

राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, जाती धर्मात मोठी तेढ निर्माण केली जात आहे, उद्योगपतींचा पैसा निवडणुकीत वापरला जात आहे. या सगळ्यातून मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आहे. त्यामुळे रक्तामांसाचा चिखल करून भाजपाने सत्तेचे कमळ फुलविले आहे. यांच्या यशाची काळी बाजू देखील समोर आली पाहिजे. त्याकरिता आम्ही लोकांमध्ये जाऊन थेट स्वरूपामध्ये काम करणार आहोत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिबीर लवकरच घेणार असल्याचे श्री. सपकाळ यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण, नागेश मोरये, विलास गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, श्री. जैतापकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!