मालवण : देवबाग गावचे विष्णू उर्फ दादू रेवंडकर यांना क्रिकेट तपस्वी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामीण क्रिकेटच्या उन्नतीसाठी आपले तन, मन, धन अर्पिणाऱ्या व्यक्तीसाठी तारकर्ली क्रिकेट क्लबने गोपाळकृष्ण केळूसकर यांच्या स्मरणार्थ अलीकडेच जाहीर केलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात देवबाग गावचे रहिवासी असलेल्या विष्णू उर्फ दादू रेवंडकर यांना शाल, श्रीफळ, रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असणाऱ्या या पुरस्काराचे कै. गोपाळकृष्ण केळूसकर यांचे चिरंजीव चंद्रशेखर गोपाळकृष्ण केळूसकर आणि त्यांच्या पत्नी तनुजा केळूसकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दादू रेवंडकर यांचा श्री स्पोर्ट्स देवबाग या संघाच्या बांधणीमध्ये मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या तालमीत दर्शन बांदेकर, नितीन बांदेकर, उमेश येरागी, हेमंत राऊळ, सचिन धुरी, रोशन धुरी, संतोष कुमठेकर हे आणि यांच्यासारखे अनेक गुणवान खेळाडू तयार झाले आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यास देवबाग आणि तारकर्ली गावातील माजी खेळाडूंचा प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता.