कणकवली : निवडणुकीआधी माझे कर्ज फेडण्यामध्ये आपण मदत केली असे सांगणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी कर्जफेडीबाबतचे पुरावे द्यावेत. कुठल्या बँकखात्यामधून त्यांनी १ कोटी ३० लाखाची रक्कम ट्रान्सफर केली ते जाहीर करावे. मी तत्काळ माझा निवडणूक प्रचार थांबवतो असे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज दिले. श्री.पारकर यांनी येथील शिवसेना कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले, नितेश राणे हे संदेश पारकर आपला मित्र असल्याचे सांगत आहेत. पण राणेंसारखा नीच मित्र कुणालाच मिळू नये असे माझे मत आहे. निवडणूक ही विकासाच्या मुद्दयावर लढली जायला हवी. पण राणेंकडून माझी संपत्ती, माझे कर्ज, माझ्या नावासारखे अन्य उमेदवार उभे करणे. मुस्लीम मतांमध्ये फुट पाडण्यासाठी उमेदवार उभा करणे. गावागावात गुंड पाठवून पैसे वाटप करणे असे उद्योग सुरू आहेत. पण राणेंच्या या असल्या घाणेरड्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्यामुळे मतदार निश्चितपणे यंदा परिवर्तन घडविणार आहेत. पारकर म्हणाले, माझ्या भाजप प्रवेशाबाबतही राणेंकडून अफवा पसरविल्या जात आहेत. वस्तुत: मी राणेंच्या आधीच भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला होता. तर राणे ज्या दिवशी भाजपात आले, त्याच दिवशी आम्ही भाजप पक्ष सोडला. त्यामुळे पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पारकर म्हणाले, राणे हे आता फक्त कुडाळ आणि कणकवली मतदारसंघापुरतेच मर्यादीत राहिले आहेत. कारण महाराष्ट्रातील एकाही सभेला नितेश राणे, नारायण राणे यांना महायुतीतर्फे बोलाविण्यात आलेले नाही. तर या निवडणुकीत राणे यांचे कणकवलीतील दुकान देखील बंद होणार आहे. मला कणकवली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे राणे आता व्यक्तीश: आरोप करत आहेत. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करत अाहेत.
पारकर म्हणाले, राणेंची दहशत एवढी आहे की त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही सोडलेले नाही. त्यांनाही त्यांनी प्रचंड त्रास दिला आहे. सावंतवाडीतील अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या ऑडिओ क्लीपमधून ते दिसून आले आहे. तर रवींद्र चव्हाण हे भाजपच्या अन्य नेत्यांना देखील नको आहेत. कारण नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या विनोद तावडे यांनी यापुढे पालकमंत्री स्थानिकच हवा असे सांगून रवींद्र चव्हाण यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.