संदेश पारकरांचा राणेंना सवाल ; कनेडीत प्रचाराचा झंझावात
कणकवली : आमदार नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघाचा विकास केला असेल तर मतांसाठी दारोदार का फिरताय? मतांसाठी पैसे का वाटताय? असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज केला. श्री.पारकर यांनी आज कनेडी पंचक्रोशीत ठिकठिकाणी सभा, रॅली घेऊन प्रचाराचा झंझावात निर्माण केला. त्यांच्यासोबत माजी खासदार विनायक राऊत, विधानसभा संघटक सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.पारकर म्हणाले, राणे कंपनी विकास केल्याचा ढोल बडवत आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागात विकासाचा निधी पोचलेलाच नाही. हा निधी राणेंच्या खिशात गेला आहे. इथल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अजूनही दयनीय आहे. अनेक गावांतील स्ट्रीट लाईट नाहीत. नळपाणी योजना बंद आहेत. गेली ३५ वर्षे राणे कुटुंबीय सत्तेत आहे. पण त्यांना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, अारोग्य यासारख्या मुलभूत सुविधा सोडवता आलेल्या नाहीत हे दुदैव आहे. पारकर म्हणाले, राणेंनी स्वत:चे मेडिकल कॉलेज आणले. पण त्याचा सर्वसामान्य रूग्णांना काय फायदा झाला? गंभीर आजारी किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या रूग्णांना अजूनही गाेवा येथेच पाठवावे लागते. रोजगारासाठी शेकडो मुले दररोज गोवा अप डाऊन करतात. तर अनेक तरूण राेजगारासाठी पुणे मुंबई गाठतात. मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री झालेल्या राणेंना ३५ वर्षात किमान एक हजार तरूणांना रोजगार देता येईल असा एकही उद्योग आणता आला नाही. उलट स्वत:च पेट्रोल पंप, हॉटेल व इतर व्यवसाय राणेंनी उभे केले. श्री.पारकर म्हणाले, कणकवली मतदारसंघात कोट्यवधी रूपयांचा निधी आणल्याचे राणे सांगत आहेत. तशी वस्तुस्थिती असेल तर आमदार नितेश राणे यांनी या विकास निधीतून किती विकास कामे झालीत हे जाहीर करावे. तसेच कणकवलीत विकास कामे केल्याची दवंडी पिटणाऱ्या राणेंनी माझ्यासोबत यावे. मी त्यांना गावागावात फिरवून इथले खराब रस्ते, बंद नळपाणी योजना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा दाखवतो. पारकर म्हणाले, करूळ घाट एक वर्ष बंद आहे. पण सत्तेत असलेल्या राणेंनी घाटमार्ग सुरू करण्यासाठी काय केले? अरूणा आणि नरडवे पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना अजूनही मुलभूत सुविधा का मिळाल्या नाहीत. याची उत्तरे नितेश राणे यांनी द्यावीत. एकूणच राणे यांच्या घराणेशाहीला, टक्केवारीला कणकवलीतील जनता कंटाळली असून या निवडणुकीत परिवर्तन निश्चित आहे.