कणकवलीत होणार जोरदार शक्तिप्रदर्शन
कणकवली | मयुर ठाकूर : विजयाची हॅट्ट्रिक करणारच, असा विश्वास व्यक्त करीत महायुतीचे उमेदवार, आमदार नीतेश राणे उद्या सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तहसील कार्यालयातील २६८ – कणकवली विधानसभा निवडणूक कार्यालयात राणे अर्ज सादर करतील. यानिमित्ताने शहरात भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर सभाही होणार आहे.
यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, गोव्याचे आरोग्य मंत्री, कोकण प्रभारी विश्वजीत राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे आदी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
अर्ज दाखल करण्याच्यानिमित्ताने महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी रॅली निघून तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल.
अर्ज दाखल केल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात जाहीर सभा होणार आहे.
महायुतीचे भाजपचे उमेदवार, आमदार नीतेश राणे विधानसभेतील आपल्या सलग तिसऱ्या प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या मागील दोन टर्ममध्ये विधानसभा कामकाज आणि भाजप संघटना यासाठी राणे यांनी मोठे योगदान दिले. विशेषतः भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आपल्या संपूर्ण मतदारसंघात त्यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्कामुळे लक्षणीय काम उभे केले आहे. आपल्या राज्यातील पक्षीय कामगिरीतील व्यस्त कामातून सुद्धा त्यांनी एक आदर्श असा मतदारसंघ तयार केला आहे. मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे यावेळी विरोधकांना राणेंसमोर उमेदवार शोधतानाही दमछाक झाली, असे सावंत यांनी म्हटले आहे.
लोकसभा विजयानंतर जिल्हयात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून विधानसभेच्या तीनही जागांवर विजय महायुतीचाच असणार आहे. जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीचे हितचिंतक तसेच जनतेने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करताना सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.