माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांचा पुढाकार
कॉजवेवर साठलेले मातीचे ढीग केले जेसीबीच्या सहाय्याने बाजूला
कणकवली : तालुक्यात गांधीनगर खलांतर येथे सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला होता. यामध्ये मोठया प्रमाणात नुकसान देखील झाले. येथील गावातील घरांच्या अंगणात तसेच मागील पडवीतील चिखल व मातीचे पाणी येवून गाळ साठला होता. तसेच गांधीनगर सुतारवाडी, वरचीवाडी, होवळेवाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या कॉजवेवर दगड मातीचे ढीग आल्यामुळे या कॉजवेंवरून होणारी वाहतूक बंद झाली.
माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी येथील नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. यावेळी मार्ग वाहतुकीस बंद असल्याचे निदर्शनास आले. तातडीने माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्रामस्थांची वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने कॉजवेवरील दगड, माती बाजूला केली. त्यामुळे तीन वाड्यांमध्ये जाणारी वाहतूक सुरु झाली. येथील ग्रामस्थांनी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे आभार मानले. यावेळी सरपंच मंगेश बोभाटे, सुधीर सावंत, संदीप सावंत, संतोष सावंत आदि ग्रामस्थ उपस्थित होते.