कणकवली : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने “ऍडव्होकेट ऍकॅडमी ऍण्ड रिसर्च सेंटर” इमारतीचा भूमिपूजन सोहळा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळ येथील सभागृहात दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या सोहळ्याचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उदयोग मंत्री उदय सामंत हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. महारष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल श्री. बिरेंद्र सराफ, गोव्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष एस. प्रभाकरन हे मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. ही अकॅडमी महाराष्ट्र गोवा, दिव व दमण येथील वकीलांसाठी उच्च दर्जाचे कायदेविषयक शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणार आहे. सदर अकॅडमीची इमारत तळोजा येथे २ एकर क्षेत्रात असून त्यामध्ये सुमारे ५० हजार चौ. फुटाची इमारत असणार आहे. सदर इमारतीमध्ये सुसज्ज असे सभागृह तसेच प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सोईसुविधायुक्त वर्ग तसेच सुमारे ३०० सहभागी यांना राहण्याची व्यवस्था या अॅकॅडमीमध्ये होणार आहे. संपुर्ण देशामध्ये अशा प्रकारची अकॅडमी पहिल्यांदाच होत आहे. या सोहळयासाठी महाराष्ट्र, गोवा, दिव तसेच दमण येथून मोठया प्रमाणात वकील वर्ग उपस्थित राहणार आहे. तरी श्री. संग्राम देसाई, अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी वकील वर्गानी या कार्यक्रमास मोठया संख्याने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.