तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पहाणी
कणकवली : सोमवारी कणकवली तालुक्यात साधारणपणे दुपार नंतर जोरदार पाऊस कोसळला. यामध्ये भिरवंडे गांधीनगर (खलांतर) येथील शेतकऱ्यांच्या राहत्या घरांमधून, पडव्यांमधून संसारोपयोगी भांडी वाहून गेल्याने व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गढूळ झाले. तसेच भात पिकाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पहाणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घेतले.
भात शेती मध्ये चिखलाचे पाणी घुसल्याने संपूर्ण भातशेती जमिनीवर पडली होती. तर विहिरींमध्ये पुराचे पाणी गेल्याने पाणी गढूळ बनले होते. घरांची पडझ़ड होवून मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते.
झालेल्या अतिवृष्टीमुळे ओहोळा- लगतच्या घरांच्या अंगणात व मागील बाजूच्या पडवीत पाणी घुसल्याने कृष्णा मेस्त्री सुतारवाडी व संभाजी सुरबा सावंत होवळेवाडी यांची संसारपयोगी भांडी तर दयानंद लवू सावंत व श्रीमती सुनीता अनाजी सावंत वरचीवाडी यांच्या घराला पाणी लागल्याने सगळा चिखल माती त्यांच्या घराला येऊन लागली होती. तसेच इतर शेतकऱ्यांची भात पिकाची मोठी हानी झाली आहे.
यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत, ग्रामसेवक वर्दम, तलाठी समृद्धी गवस आदींनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून नुकसानीचे पंचनामे करून घेतले.