ओरोस : एकाच गाळ्याचे दोन
कुडाळ : वेगवेगळ्या व्यक्तीसोबत साठेखत करून तक्रारदार यांना गाळा न देता आपले स्वतःचे ऑफिस टाकून फसवणूक करणाऱ्या बिल्डरला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. कुडाळ येथील गॅलेक्सी अपार्टमेंटचे बांधकाम व्यावसायिक विलास गावडे यांनी तक्रारदार यांना १५ लाख रुपये १२ टक्के व्याजदराने परत करणे, दीड लाख नुकसानभरपाई आणि तक्रार करण्यासाठी आलेला ३० हजार रुपयांचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार सुप्रिया सावंत यांनी व्ही. आर. एस. ग्रुपतर्फे भागीदार विलास आणि मानसी तावडे यांच्याकडून पिंगुळी, कुडाळ येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील दुकानगाळा खरेदी करण्यासाठी साठेखत नोटराईज्ड केले होते. तक्रारदाराने बांधकाम व्यावसायिक विलास तावडे यांच्याकडे सप्टेंबर २०२१ मध्येच १५ लाख रुपये दुकानगाळ्याकरिता दिले. तरीही बिल्डर विलास तावडे यांनी तक्रारदाराला दुकानगाळ्याचा ताबा दिला नाही आणि दुकानगाळ्याचे खरेदीखतही करून दिले नाही. सुप्रिया सावंत यांच्याशी दुकानगाळ्याचे साठे करार करण्यापूर्वीच त्याच बिल्डरने अन्य एका व्यक्तीसोबत त्याच दुकानगाळ्याचा नोंदणीकृत साठे करार केला होता. ही बाब सुनावणीवेळी समोर आली. अशाप्रकारे बिल्डर विलास तावडे यांनी २ विविध व्यक्तींकडून दुकानगाळ्याकरिता अनेक लाख रुपये घेतले आणि दोघांनाही खरेदीखत अगर ताबा दिला नाही. याउलट या दुकानगाळ्यामध्ये स्वतःचे ऑफिस थाटले. बिल्डरचे हे कृत्य म्हणजे अनुचित व्यापारी प्रथा असून सेवेमध्ये कमतरता आहे, असा निष्कर्ष सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नोंदविला. बिल्डर तावडे यांनी तक्रारदाराला तिचे १५ लाख रुपये द.सा.द.शे. ११ टक्के व्याजासकट परत करावे आणि १ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई आणि ३० हजार रुपये तक्रार अर्जाचा खर्च अशी रक्कम अदा करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.