शासनाकडून ६० कोटींचा निधी मंजूर
कणकवली : नाटळ – राजवाडी – मोगरणे येथील लघु पाटबंधारे धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या धरणामुळे गावातील सुमारे २५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यासाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
नाटळ गावातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या मोगरणे परिसरात लघु धरण उभारण्याची मागणी सातत्याने येथील शेतकरी व नागरिक करत होते.
मात्र, आश्वासनांपलीकडे कृती होत नव्हती. या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रमुख बबन सावंत, सरपंच सुनील घाडीगावकर, उपसरपंच पंढरीनाथ तायशेटे यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांच्या माध्यमातून गतवर्षी आमदार नितेश राणे यांच्याकडे लघु धरण बांधण्याची मागणी केली होती. हे लघु धरण झाल्यास परिसरातील शेतीला बारमाही पाणी उपलब्ध होईल. त्याचबरोबर नाटळ-मोहुळ परिसरात उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणी टंचाईवरही मात करता येईल या बाबी त्यांनी आमदार नितेश राणेंच्या लक्षात आणून दिल्या होत्या. आमदार नितेश राणेंनीही याबाबत आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली होती.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांनीही याबाबत आमदार राणेंच्या माध्यमातून राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा कायम ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.
२५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
या धरण प्रकल्पासाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या धरणामुळे नाटळ गावातील २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून, गाव सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी मदत होणार आहे. ४ मार्च रोजी या धरण प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, आमदार नितेश राणे यांनी देऊ तो शब्द पूर्ण करू, याची प्रचिती दिली आहे. याबद्दल नाटळ ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे तसेच संदेश ऊर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांचे आभार मानले आहेत