डिवायएसपी कार्यालयावर धडक ; पोलिस निरिक्षकांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांची माघार
सावंतवाडी : माडखोल येथे घडलेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास चुकीच्या पध्दतीने केला जात आहे, असा आरोप करत तपास करणार्या अधिकार्यांकडून तो तपास काढून घेण्यात यावा, अशी मागणी करत तेथील ग्रामस्थांनी आज येथील डि.वाय.एस.पी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज येथील डिवायएसपी कार्यालयावर धडक दिली. यावेळी तपास करणारा अधिकारी बदलण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुलीचे नाव लिहून आत्महत्या केली असली तरी आम्ही नाहक कोणाला त्रास देणार नाही, अशी भूमिका पोलिस निरिक्षक अमोल चव्हाण यांनी घेतली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सौ.घारे यांनी दुरध्वनीवरुन महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. यावेळी महाराष्ट्रात अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेवून हा प्रकार हाताळा, अशा सुचना त्यांनी पोलिस निरिक्षकांना केल्या.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी उपसभापती बाबल अल्मेडा बावळाट सरपंच सोनाली परब, माडखोल ग्रामस्थ राजकुमार राऊळ, संजय लाड, संतोष राऊळ, संतोष राणे, विशाल राऊळ, संदीप सुकी, मनोज घाटकर, संकेत राऊळ, उल्हास राणे, सत्यवान बंड, प्रमोद बंड, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अँड. सायली दुभाषी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान यांसह माडखोल मेटवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.