राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या पाश्र्वभूमीवर ठाकरे शिवसेनेची मागणी
बांदा : देशासह राज्यात सध्या महिलांवर अत्याचाराच्या घटना या सातत्याने घडत असून बांदा शहरातही रोडरोमिओकडून महिला व विशेषतः महाविद्यालयीन युवतीना त्रास होऊ नये यासाठी शाळा सुटण्याच्या वेळी बांदा बसस्थानकावर पोलीस कर्मचारी तैनात ठेवावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांना आज निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, बांदा बसस्थानक हे नेहमीच गजबजले असते. याठिकाणी दुपारच्या वेळी शाळा महाविद्यालय सुटल्यावर मुलींची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असते. येथून दररोज हजारो महिला प्रवाशी प्रवास करत असतात. सध्या ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी देखील काही रोडरोमिओकडून मुलींना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. शाळा महाविद्यालय सुटल्यावर मुलींचा पाठलाग करून त्यांच्याकडे संपर्क क्रमांक मागण्याच्या घटना देखील घडत आहेत. या प्रकारांना आळा बसण्यासाठी येथे पोलीस कर्मचारी तैनात करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक बडवे यांनी दिवसा याठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख साई काणेकर, मंथन गवस, भाऊ वाळके, सागर धोत्रे, बिपिन येडवे, साहिल खोबरेकर, ज्ञानेश्वर येडवे आदी उपस्थित होते.